
दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यासाठी जुलमी इंग्रजी राजवटीविरोधात लढलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर(freedom fighter Savarkar) यांच्याविषयी एका महिलेने केलेल्या आक्षेपार्ह ट्विट प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सदर महिलेविरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते, खासदार राहुल शेवाळे(MP Rahul Shewale) यांनी गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी संबधित यंत्रणांना आदेश देऊन हे आक्षेपार्ह ट्विट त्वरित हटवण्याची मागणीही खासदार शेवाळे यांनी केली आहे. गृह राज्यमंत्र्यांची भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनात खासदार शेवाळे यांनी ही मागणी केली आहे.
आपल्या निवेदनात खासदार शेवाळे यांनी लिहिले आहे की, 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.47 वाजता मोना आंबेगावकर नावाच्या महिलेने @MonaAmbegaokar या ट्विटर हॅण्डल वरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अतिशय गंभीर स्वरूपाचे आक्षेपार्ह ट्विट केले आहे. कोणताही ऐतिहासिक पुरावा किंवा कुठल्याही प्रकारची खात्रीलायक माहिती नसताना देखील अतिशय हीन दर्जाच्या भाषेत या ट्विट मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मतप्रदर्शन करणे, हे अतिशय खेदजनक असून मी याचा निषेध करतो. संबधित यंत्रणांना आदेश देऊन हा आक्षेपार्ह मजकूर त्वरित हटवला जावा. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने सदर महीलेविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
आपल्या माठातून पाणी प्यायल्याच्या शुल्लक कारणावरून एका दलित विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्याची राजस्थान मध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. या मारहाणीमुळे राजस्थानच्या सुराणा गावातील 8 वर्षीय इंद्र कुमार मेघवाल या दलित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या निष्पाप विद्यार्थ्याच्या मृत्यूला जबाबदार असणारा सरस्वती विद्यालयाचा संस्थापक छैलसिंग याला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून छैलासिंग आणि या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील या भेटीदरम्यान खासदार शेवाळे यांनी गृह राज्यमंत्र्यांना केली. तसेच, या प्रकरणात सदर विद्यार्थ्याच्या कुटुंबाकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांविषयी सकारात्मक विचार करण्याची विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे. याविषयी लेखी निवेदन देऊन या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली.