PM Modi Diet Plan : 76 व्या वर्षीही फिट आणि एनर्जेटिक… मोदींचा डाएट प्लान आहे तरी काय?

पंतप्रधान मोदींच्या 76 व्या वर्षीही फिटनेसचे रहस्य त्यांच्या साध्या डाएटमध्ये आहे. ते कोणताही कठोर डाएट प्लान फॉलो करत नाहीत, फक्त शाकाहारी भोजन घेतात. 'जे मिळालं ते खाल्लं' यावर विश्वास ठेवून, 'पोटभरू नव्हे, मन भरून खा' असे सांगतात. श्वास घेण्याच्या योग्य पद्धतीवर आणि शारीरिक आरोग्याला प्राधान्य देण्यावर भर देतात.

PM Modi Diet Plan : 76 व्या वर्षीही फिट आणि एनर्जेटिक... मोदींचा डाएट प्लान आहे तरी काय?
Narendra Modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 17, 2026 | 11:38 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 76 वा वाढदिवस आहे. वाढत्या वयाबरोबरच प्रत्येकाला फिटनेस टिकवणं कठिण असतं. एनर्जी टिकवून ठेवणंही अवघड असतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र याला अपवाद आहेत. या वयातही मोदी फिट आणि एनर्जेटिक आहेत. अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. देश, विदेशातील दौरे असोत की राजकीय कार्यक्रम असोत… पंतप्रधान मोदी नेहमीच सक्रिय असतात. विशेष म्हणजे रात्री उशिरा झोपूनही मोदी पहाटे लवकर उठून कामाला लागतात. त्यामुळे मोदींच्या फिटनेसच्या रहस्याबाबत नेहमीच गूढ राहिलं आहे. मोदी इतके फिट कसे राहतात? ते कोणती डाएट घेतात? असे सवाल केले जातात. मात्र मोदींनीच आपल्या या डाएटवर भाष्य केलं आहे.

फेब्रुवारीत विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावळी एका विद्यार्थ्याने मोदींना त्यांच्या फिटनेसचं रहस्य आणि डाएटबाबत विचारलं होतं. त्यावर मोदींनी आपला डाएट प्लानच विद्यार्थ्यांसोबत शेअर केला होता. खरं सांगायचं तर माझी कोणतीच अशी ठरावीक डाएट सिस्टिम नाहीये. आयुष्यात मला कार्यकर्ता म्हणून वेगवेगळ्या काळात विविध कुटुंबांसोबत राहण्याचा योग आला. त्यामुळे तिथे जे जेवण मिळायचं तेच करायचो. एवढं मात्र नक्की की, मी शाकाहारी आहे. फक्त शाकाहारीच भोजन घेतो, असं मोदींनी सांगितलं होतं.

जे मिळालं ते खाल्लं

एक कार्यकर्ता म्हणून मी अनेक ठिकाणी फिरलो. अनेक शहरात, गावात गेलो. वेगवेगळ्या कुटुंबासोबत राहिलो. तेव्हा तिथे जे काही बनवलं जात होतं ते खात होतो. अनेकदा तर मला स्वत: स्वयंपाक बनवावा लागत असे. अशावेळी मी साधा आणि हलका आहार घेण्यावर भर देत होतो, असं मोदी म्हणाले होते. तसेच जेवणाच्या अत्याधिक नियमात स्वत:ला बांधून घेण्याऐवजी जेवढं गरजेचं आहे, तेवढंच खाल्लं पाहिजे. आपल्या पसंतीनुसार जेवण घेतलं पाहिजे, असा कानमंत्रही त्यांनी दिला होता.

औषधासारखं खाऊ नका

डाएटला जीवनशैलीचा भाग बनवला तरच ती यशस्वी होते. डाएट आपल्या पसंतीची असली पाहिजे. औषधाप्रमाणे डाएट असू नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. केवळ मजबुरी म्हणून किंवा कुठलं तरी टार्गेट ठेवून आपण जेवत असू तर त्याचा आनंद कमी होतो. त्यामुळे दीर्घकाळ डाएट फॉलो करणं कठिण होऊन जातं, असंही त्यांनी नमूद केलं होतं.

पोटभरू नव्हे, मन भरून खा

मोदींनी खाण्याच्या सवयींवरही भर दिला आहे. प्रत्येकाने एक गोष्ट ठरवली पाहिजे. ती म्हणजे तुम्हाला पोट भरून खायचंय की मन भरून? तुम्ही ही गोष्ट एकदा ठरवली तर सर्व गोष्टी सोप्या होतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. बहुतेक लोकं तर त्यांना कोणी टोकत नाही, तोपर्यंत खातच राहतात. लोक अन्न पदार्थ पोटभरून खातात, पण शरीराच्या इतर गरजांकडे दुर्लक्ष करतात, असंही ते म्हणाले होते.

जेवणा एवढाच श्वास महत्त्वाचा

आपण फक्त जेवणाकडे अधिक लक्ष देतो. पण योग्य पद्धतीने श्वास घेण्याकडे लक्ष देत नाही. जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा दीर्घ श्वास घ्या. काही वेळासाठी संपूर्ण क्षमतेने दीर्घ श्वास घ्या. त्यानंतर श्वास हळूहळू सोडा. हा अभ्यास शरीर आणि मनाला ऊर्जा निर्माण करून देण्याचं काम करतो, असंही त्यांनी सांगितलं होतं.

शरीराला प्राधान्य द्या

आज धावपळीच्या जगात लोक शरीराला शेवटी ठेवतात. नको त्या गोष्टीला पहिलं प्रधान्य देतात. जबाबदाऱ्या आणि तणावाच्या दरम्यान आरोग्य नेहमीच मागे राहतं. जर व्यक्ती निरोगी असेल तर तो बाकीच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतो, असंही त्यांनी म्हटलं होतं.

सूर्योदय पाहिल्याने पॉझिटिव्ह एनर्जी

यावेळी त्यांनी पहाटे पहाटे उठण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. पहाटे पहाटे उठल्याने आणि सूर्योदय पाहिल्याने मोठा फायदा होतो. उगवत्या सूर्याला पाहिल्याने मन आणि शरीराला नवीन ऊर्जा मिळते. या सवयीमुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक होते, असंही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us