
सालाबाद प्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नवी दिल्लीत बैठक होत आहे. अखिल भारतीय स्तरावरील प्रांत प्रचारकाची बैठक होत आहे. ही बैठक दिनांक 4, 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. राजधानी दिल्लीतील केशवकुंज या संघाच्या कार्यालयात ही बैठक होत आहे.
देशभरातील सर्व प्रांत प्रचारक, सह प्रांत प्रचारक तसेच क्षेत्र प्रचारक व सह क्षेत्र प्रचारक हे बैठकीस उपस्थित राहणार आहेत. संघाच्या संघटन रचनेत एकूण 11 क्षेत्रे आणि 46 प्रांत स्थापन करण्यात आले आहेत. या बैठकीत संघ प्रेरित विविध संस्थांच्या अखिल भारतीय संघटन मंत्र्यांचा देखील सहभाग असणार आहे. मागील मार्चमध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बैठकीनंतर देशभरात एप्रिल, मे आणि जून महिन्यांत संघाच्या विविध स्तरांवरील प्रशिक्षण वर्ग पार पडल्यानंतर येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते.
या बैठकीत नुकतेच पार पडलेले प्रशिक्षण वर्ग, त्यांचा वृत्तांत व समीक्षा, येणाऱ्या शताब्दी वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची योजना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा वर्ष 2025-26 या वर्षातील प्रवास कार्यक्रम यावर चर्चा होणार आहे. संघाचे शताब्दी वर्ष (2025-26) हे येणाऱ्या विजयादशमीपासून म्हणजेच 2 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होऊन पुढील वर्षीच्या विजयादशमी 2026 पर्यंत चालणार आहे.
या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, माननीय सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, सर्व सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, सी. आर. मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त, आलोक कुमार, अतुल लिमये यांच्यासह सर्व अखिल भारतीय कार्य विभाग प्रमुख, सह प्रमुख आणि कार्यकारिणीचे सदस्य सहभागी होणार आहेत. बैठकीसाठी सरसंघचालक यांचे 28 जून रोजी दिल्लीमध्ये आगमन होणार आहे.