Neha Bora : सीजेपीच्या आंदोलनाशी संबंधच नाही… नेहा बोराचा कोर्टात धक्कादायक दावा; अभिजीत दीपकेंना मोठा झटका
नेहा बोरा हिने दिल्ली उच्च न्यायालयात सीजेपीच्या आंदोलनापासून (सेंट्रल पार्क) स्वतःला दूर केल्याने अभिजीत दीपके आणि पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तिने पोलिसांच्या नोटीसला आव्हान दिले आहे. आपण दुसऱ्या संघटनेच्या कार्यक्रमाला मंडी हाऊसला गेले होते, असे बोरा यांनी कोर्टात सांगितले.

कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांना मोठा झटका बसला आहे. सीजेपीच्या खंद्या समर्थक नेहा बोरा यांनी कोर्टाला दिलेल्या धक्कादायक विधानाने सीजेपीमध्ये खळबळ उडाली आहे. नेहाने सीजेपीच्या कॅनॉट प्लेसमध्ये झालेल्या आंदोलनापासून स्वत:ला वेगळं केलं आहे. सेंट्रल पार्कात बोलावण्यात आलेल्या आंदोलनात मी नव्हते. मला दुसऱ्या संघटनेने बोलावलं होतं. मी मंडी हाऊसला गेले होते, असं नेहा बोराने कोर्टाला सांगितल्याने खळबळ उडाली आहे. म्हणजेच नेहाने सीजेपीच्या आंदोलनापासून फारकत घेतली आहे.
AISA ची विद्यार्थी नेता नेहा बोरा हिच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या नोटिशीला नेहाने आव्हान दिलं आहे. यावेळी नेहाच्या बाजूने सीनिअर वकील शंकरनारायणन हे युक्तिवाद करत आहेत. मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. नेहा सेंट्रल पार्कच्या आंदोलनात सामील नव्हती. तिला दुसऱ्या एका संघटनेने बोलावलं होतं. त्यामुळे ती गेली होती. तिचा सेंट्रल पार्कच्या आंदोलनाशी संबंध नाही. ती त्या आंदोलनात सामील नव्हती. मंडी हाऊसमध्ये मिटिंग करण्यासाठी ती गेली होती, असं शंकरनारायणन यांनी म्हटलं आहे.
मला परवानगीची गरज नाही
मला तिरंगा फडकवण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही, असं नेहाने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितलं. तिने पोलिसांच्या पीस बॉन्डला आव्हान दिलं आहे. हे प्रकरण अत्यंत छोटं आहे. एका नोटीशी संबंधातील हे प्रकरण आहे. BNSS च्या सेक्शन 126 आणि 130 अंतर्गत जारी करण्यात आलेल्या नोटिशी संदर्भातील हे प्रकरण आहे, असं तिच्या वकिलाने म्हटलं आहे.
घोषणा दिल्या म्हणून…
16 ऑक्टोबर रोजी नेहा मंडी हाऊसला गेली होती. तिथे 10 ते 15 मिनिटातच तिला ताब्यात घेण्यात आलं. नेहाने काही गुन्हा केला नाही. केवळ घोषणाबाजी केली म्हणून ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबीयांना आणि वकिलांना भेटण्याची परवानगी दिली पाहिजे. पण नेहाला रात्री आरके पुरम पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. सकाळपर्यंत ती कुठे आहे याची कुणाला माहिती नव्हती, असं वकिलाने म्हटलं. दरम्यान,, 17 ऑक्टोबर रोजी सकाळी नेहाला सोडून देण्यात आलं होतं.