54 व्या वर्षी करण जोहरचं लग्नाबाबत मोठं विधान, सांगितलं कसा पाहिजे जोडीदार
करण जोहर सध्या त्याच्या कॉफी विथ करण 9 या शोमुळे चर्चेत आहे. अशातच आता या शोमध्ये करणने लग्नाबाबत मोठं विधान केलं आहे. त्यासोबत त्याने त्याला कसा जोडीदार हवा आहे याबद्दल देखील खुलासा केला आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर सध्या त्याच्या ‘कॉफी विथ करण 9’ या चॅट शोमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. शोच्या नव्या भागात अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या दोघांशी संवाद साधताना करणने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मनातील इच्छा व्यक्त केली. आपल्यालाही आयुष्यात प्रेम करणारा आणि सुख-दुःखात साथ देणारा जोडीदार हवा असल्याचे त्याने सांगितले. मात्र, लग्न करणे कदाचित आपल्यासाठी शक्य होणार नाही असेही तो म्हणाला.
संवादादरम्यान विजय देवरकोंडाने करणला आयुष्यात कोणती गोष्ट पूर्ण व्हावी असे वाटते असा प्रश्न विचारला. त्यावर करणने आपल्याला आयुष्यात जोडीदार हवा असल्याचे स्पष्ट केले. दैनंदिन आयुष्यातील छोट्या-मोठ्या गोष्टी शेअर करता येतील, आनंदाचे क्षण एकत्र साजरे करता येतील आणि भावनिक आधार मिळेल अशी व्यक्ती त्याला हवी आहे.
करणने पुढे सांगितले की, आपल्या जुळ्या मुलांच्या संगोपनातही जोडीदाराने समान सहभाग घ्यावा अशी त्याची इच्छा आहे. त्याला प्रेम आणि आदर देणारी तसेच आयुष्य अधिक परिपूर्ण करणारी व्यक्ती आपल्या सोबत असावी असेही त्याने म्हटले.
विजय देवरकोंडाने केली खास प्रार्थना
करणचे मनोगत ऐकल्यानंतर विजय देवरकोंडाने त्याच्या इच्छेसाठी मजेशीर अंदाजात प्रार्थना केली. कॉफीच्या आणि त्या सोफ्याच्या देवतांनी करणची इच्छा पूर्ण करावी असे तो म्हणाला. विजयच्या या बोलण्यावर करण हसला आणि त्याची प्रार्थना मनापासून असल्याचे आपल्याला वाटल्याचे त्याने सांगितले.
करण जोहरच्या आगामी चित्रपटांची चर्चा
दरम्यान, करण जोहर धर्मा प्रॉडक्शन्सच्या माध्यमातून अनेक चित्रपटांवर काम करत आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘उडता तीर’ या चित्रपटाचा समावेश आहे. तसेच कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असलेला ‘नागजिला’ हा चित्रपटही चर्चेत आहे.
दरम्यान, इतर कलाकारांच्या प्रेमजीवनाबद्दल प्रश्न विचारणाऱ्या करण जोहरने यावेळी स्वतःच्या आयुष्यातील भावनिक गरज व्यक्त केली. प्रेम, आदर आणि मुलांच्या संगोपनात साथ देणारा जोडीदार हवा असल्याचे त्याने सांगितल्याने त्याच्या या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.
