वडिलांचा अत्यंविधी उरकून परतताना भीषण अपघात, मुलगा जागीच ठार, इतर गंभीर

कर्नाटकमध्ये रेल्वे अपघातात वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर गुजरातला परतत असताना एका नेपाळी कुटुंबाचा रस्ते अपघात झाला. यात ३५ वर्षीय हर्षद झंकार योगी यांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.

वडिलांचा अत्यंविधी उरकून परतताना भीषण अपघात, मुलगा जागीच ठार, इतर गंभीर
Car accident
| Updated on: May 14, 2025 | 6:47 PM

कर्नाटक येथे रेल्वे अपघातात निधन झालेल्या वडिलांचा अत्यंविधी उरकून गुजरातकडे परतत असताना एका नेपाळी कुटुंबाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत हर्षद झंकार योगी (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात करमाळा-कुर्डूवाडी रस्त्यावरील वरकुटे गावाजवळ पहाटे साडेचारच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील हे नेपाळी कुटुंब बंगळूर येथे झंकर योगी यांच्या अस्थिविसर्जनाच्या विधीसाठी गेले होते. ही विधी आटोपून एका कारने ते परत गुजरातकडे येत होते. यावेळी कुर्डूवाडीहून येत असताना वरकुटे गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने त्यांची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली. यात झंकार योगी यांचा पूत्र हर्षद झंकार योगी जागीच ठार झाला आहे.

तर चार जण जखमी झाले आहेत. या अपघातात दिनेश हिरा नाथयोगी (वय ४०), कृष्णा गोरबहादुर कुवर (वय ५०), पुष्कर झंकर योगी (वय ३०, सर्व राहणार वापी, गुजरात) आणि निशा हर्षद योगी (वय ३५, रा. बंगळूर, कर्नाटक) हे जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वीच झंकार योगी यांचा रेल्वेमधून पडून झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता.

दोघांची प्रकृती चिंताजनक

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मेजर आनंद पवार, हवालदार आप्पा लोहार, सतीश इंगोले आणि माजी सैनिक ॲम्ब्युलन्स चालक साजिद शेख यांनी जखमींना आणि मृताला तातडीने बाहेर काढले. जखमींना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त इतर गंभीर जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हळहळ व्यक्त

या दुर्घटनेप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.