Monsoon prediction : शेतकऱ्यांना दिलासा देणारं संशोधन, तब्बल 84 वर्षांच्या पावसावर अभ्यास; मान्सून आगमनाची अचूक वेळ कळणार
मान्सूनचं आगमन नेमकं कधी झालं, हे ओळखण्यासाठी आयआयटी मद्रास आणि गुवाहाटी विद्यापीठाच्या संशोधकांनी नवी पद्धत विकसित केली आहे. 84 वर्षांच्या पावसाच्या आकडेवारीच्या अभ्यासातून काय समोर आलं?

भारत हा शेतीप्रधान देश असल्याने देशातील शेतकऱ्यांसाठी मान्सूनचा अंदाज अत्यंत महत्त्वाचा असतो. पावसाचे आगमन कधी होणार, तो किती काळ सक्रिय राहणार आणि कोणत्या भागात किती पाऊस पडणार, यावर शेतीचे नियोजन अवलंबून असते. हवामान विभागाकडून दरवर्षी मान्सूनचे अंदाज जाहीर केले जातात. मात्र, प्रत्यक्ष पाऊस आणि अंदाज यामध्ये अनेकदा तफावत दिसून येते. त्यामुळे पावसाचा अधिक अचूक अंदाज वर्तवण्यासाठी संशोधकांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
आता आयआयटी मद्रास आणि गुवाहाटी विद्यापीठातील संशोधकांनी मान्सूनचे आगमन ओळखण्यासाठी एक नवी पद्धत विकसित केली आहे. विशेष म्हणजे, या संशोधनासाठी गेल्या 84 वर्षांतील पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला आहे. या संशोधनामुळे एखाद्या भागात झालेला पहिला पाऊस आणि प्रत्यक्ष मान्सूनचे आगमन यातील फरक ओळखता येणार आहे.
काय आहे मान्सून ओळखण्याची नवी पद्धत?
संशोधकांनी हवामान नेटवर्क आणि जटिल प्रणालींच्या सिद्धांताचा वापर करून ही पद्धत विकसित केली आहे. यामध्ये देशातील वेगवेगळ्या भागांतील पावसाचा अभ्यास करण्यात आला. एखाद्या ठिकाणी पाऊस सुरू झाला म्हणजे मान्सूनचे आगमन झाले, असे मानले जाणार नाही. तर वेगवेगळ्या भागांतील पावसाचे छोटे समूह एकमेकांशी जोडले जाऊन मोठे समूह तयार होतात का, हे पाहिले जाणार आहे. जेव्हा पावसाचा हा मोठा समूह विस्तारू लागतो आणि उत्तरेकडे सरकतो, तेव्हा मान्सूनचे आगमन झाल्याचे स्पष्ट होते, असे मानले जाणार आहे.
संशोधनातून काय समोर आले?
या अभ्यासानुसार, ईशान्य भारतात साधारण 15 मेच्या आसपास मान्सूनची मोठ्या प्रमाणावर सुरुवात होते. तर द्वीपकल्पीय भारतात ही सुरुवात साधारण 9 जूनच्या आसपास होते. एप्रिलमध्ये ईशान्य भारतातील काही भागांत स्थानिक मान्सूनचे छोटे समूह तयार होतात. पुढे हे समूह बंगालच्या उपसागरातील पावसाच्या समूहाशी जोडले जातात. त्यानंतर केरळमधील मान्सूनचा समूहही या मोठ्या समूहाशी जोडला जातो.
शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?
आयआयटी मद्रासचे प्राध्यापक आर. आय. सुजीत यांच्या मते, या पद्धतीमुळे मान्सूनच्या चुकीच्या सुरुवातीचा अंदाज टाळता येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य वेळ ठरवता येईल. तसेच सरकारला पाणी साठवण, जलव्यवस्थापन आणि पूरस्थितीचा सामना करण्यासाठी नियोजन करता येईल. या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल ऑफ क्लायमेट या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत.