बायकोसोबत स्वित्झर्लंड फिरायला जात होता, अबूधाबीत त्याला ताब्यात घेतलं, त्याच्यासोबत जे होतंय, कुणासोबतही होवू नये

सहलीला जाणाऱ्या एका जोडप्याला अत्यंत विचित्र असा अनुभव आला आहे. असा किस्सा आपण एखाद्या चित्रपटात घडल्याचे पहिले असेल.

बायकोसोबत स्वित्झर्लंड फिरायला जात होता, अबूधाबीत त्याला ताब्यात घेतलं, त्याच्यासोबत जे होतंय, कुणासोबतही होवू नये
सांकेतिक छायाचित्र
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 16, 2022 | 12:13 PM

नवी दिल्ली, ग्रेटर नोएडा येथे राहणारे प्रवीण शर्मा (Noida Couple) व त्यांची पत्नी हे दाम्पत्य स्वित्झर्लंडला फिरायला गेले होते, मात्र अबू धाबी पोलिसांनी (Abu Dhabi Police Arrested) या जोडप्याला तिथेच ताब्यात घेतले. त्यामागचे कारण फारच धक्कादायक आहे. अबुधाबी पोलिसांनी दावा केला आहे की प्रवीणचा चेहरा गुन्हेगारासारखा आहे, त्यानंतर प्रवीणला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्या पत्नीला भारतात परत पाठवण्यात आले. गेल्या 48 तासांपासून कुटुंबीयांचा प्रवीणशी संपर्कही होऊ शकलेला नाही. पीडितेच्या कुटुंबीयांनी आता डीएम सुहास एलवाय यांच्याकडे तक्रार केली आहे. डीएम यांनी यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिले आहे.

नेमके काय घडले?

प्रवीण शर्मा यांची पत्नी कृष्णा यांनी सांगितले की, आम्हाला स्वित्झर्लंडला जायचे होते. इथून आम्ही अबुधाबीला गेलो, तिथे आमचे विमान थांबताच प्रवीण कुमार बाहेर यावे अशी घोषणा झाली. यानंतर पुन्हा एकदा घोषणा झाली. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि काय झाले असे विचारले असता त्यांनी सांगितले की, तुम्हाला आमच्यासोबत यावे लागेल.

आम्ही त्यांना कारण विचारले असता त्याने सांगितले की, तुमचा चेहरा कुणाशी तरी मिळता-जुळता आहे. त्यामुळे तुम्हाला आमच्यासोबत जावे लागेल. त्यानंतर आम्ही दोघेही त्यांच्यासोबत गेलो. तिथे गेल्यावर पोलीस आमचे पासपोर्ट घेऊन आत गेले. हा नेमका काय प्रकार घडतोय हे आम्हाला काळेच ना!

थोड्या वेळाने ते बाहेर आले तेव्हा मी विचारले काय झाले, तर त्यांनी सांगितले की त्यांनी माझे डोळे तपासले. दोन तासांनी त्यांनी आम्हाला सोडले आणि आम्ही परत आलो. त्यानंतर परत आम्हाला तिथेच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या. एका अधिकाऱ्याने मला पासपोर्ट दिला आणि मला म्हणाले की तुम्ही परत जा. यानंतर त्याने प्रवीणला सांगितले की, तुमचा चेहरा कुणाशीतरी मिळत जुळत असल्याने तुमची तपासणी केली जाईल. फिरायला जात असलेल्या एखाद्या जोडप्यासोबत असा धक्कादायक प्रकार घडू शकतो हे आतापर्यंत आपण केवळ चित्रपटातच पाहिलेले आहे.

पीडित कुटुंबाची न्यायासाठी मागणी

पीडितेच्या कुटुंबीयांनी आता या प्रकरणाबाबत गौतम बुद्ध नगर डीएम सुहास एलवाय यांच्याकडे दाद मागितली आहे. याबाबत अधिक माहिती देताना डीएम म्हणाले की, हमीरपूर गावातील प्रवीण शर्माच्या कुटुंबाला अबुधाबी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुटुंबातील लोकांनी मला भेटून ही माहिती दिली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार तो बाहेर फिरायला जात होता. त्यांना  अबुधाबीहून फ्लाइट बदलावी लागली पण तेथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. प्रवीण शर्माचा चेहरा एका गुन्हेगारांशी मिळत जुळत होता, म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आले.

स्थानिक पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू असून प्रवीण शर्माचे चारित्र्य पडताळणीही केली जात असल्याचे डीएम म्हणाले. या प्रकरणाबाबत कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्रालय, गृह विभाग आणि दूतावासाला अर्ज दिला आहे. याप्रकरणी आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.