
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर भारतानं आता पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सिंधू नदी कराराला स्थगिती देण्यात आली आहे, तसेच अटारी बॉर्डर बंद करण्यात आली असून, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. त्यांना आपल्या देशात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारताच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानने भारतासाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. तसेच व्यापार देखील बंद केला आहे. पाकिस्तानी नेत्यांकडून सातत्यानं विखारी वक्तव्य करण्यात येत आहेत. युद्धाच्या पोकळ धमक्या देण्यात येत आहेत. दरम्यान त्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या युट्यूब चॅनलवर देखील बंदी घातली आहे, भारतानं पाकिस्तानच्या युट्यूब चॅनलवर बंदी घातल्यानंतर आता पाकिस्तानकडून भारतीय गाण्यांवर बंदी घालण्यात आली आहे, तेथील प्रसारमाध्यमांना भारतीय गाणे प्रसारीत न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाकिस्तानवर दबाव वाढला
पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं घेतलेल्या भूमिकेमुळे पाकिस्तानवर दाबाव वाढला आहे. भारतानं सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती दिली आहे. तसेच अटारी बॉर्डर देखील बंद केली आहे. भारताचा पाकिस्तानसोबत व्यापार बंद झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला आहे. तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पाकिस्तानकडून देशात सायरन देखील बसवण्यात आले आहेत. पाकिस्तानवरील दबाव वाढला आहे.
दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. याबाबत अमेरिका काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, अमेरिकेनं तटस्थ भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच संघर्ष होत असतात, यावर दोन्ही देशांनी चर्चा करून तोडगा काढावा, दोन्ही देश आमच्यासाठी जवळचे आहेत, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तर चीन मात्र पाकिस्तानची बाजू घेताना दिसत आहे.