भारतीय मतदारांचा जगात 1 नंबर, पाहा भारतात यंदा किती कोटी मतदार?

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. देशात सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात देखील ५ टप्प्यात मतदान होणार आहे. भारतात मतदारांची संख्या पाहता जगात सर्वाधिक भारतीय मतदारांची संख्या अधिक असल्याचं समोर आले आहे.

भारतीय मतदारांचा जगात 1 नंबर, पाहा भारतात यंदा किती कोटी मतदार?
| Updated on: Mar 16, 2024 | 9:13 PM

Loksabha election : 1951 साली जेव्हा देशात पहिल्यांदा निवडणूक झाली, तेव्हा मतदारसंख्या 17 कोटी ३२ लाख होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातली एकूण मतदारसंख्या जवळपास 97 कोटी आहे. इतके मतदार असणारा भारत जगातला एकमेव देश आहे. याची तुलना करायची झाल्यास संपूर्ण युरोपचे देश एकत्र केले, तरी त्यांची एकूण लोकसंख्या ७५ कोटींच्या वर जात नाही. म्हणजे युरोपच्या एकूण लोकसंख्येपेक्षा २२ कोटी अधिकचे फक्त मतदार भारतात आहेत. निवडणुकीच्या कामात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष 6 कोटींहून जास्त लोकांचा सहभाग असतो. हा आकडा अख्ख्या ब्रिटनच्या लोकसंख्येहून अधिक आहे.

2019 ला देशात 89 कोटी 6 लाख मतदार होते. 2024 ला 96 कोटी 8 लाख मतदार असतील.
2019 ला 46 कोटी 5 लाख पुरुष होते, तर यंदा 49 कोटी 7 लाख आहेत.
गेल्यावेळी 43.1 कोटी महिला मतदार होत्या, यंदा 47 कोटी 1 लाख महिला मतदार असतील
5 वर्षात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या १ कोटीनं अधिक आहे.

15 कोटी 30 लाख मतदार असणारं उत्तर प्रदेश राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्रातली मतदारसंख्या 9 कोटी १२ लाख इतकी आहे. पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रातले सर्वाधिक म्हणजे 81 लाख 27 हजार 19 मतदार आहेत. तर 6 लाख 57 हजार 780 मतदार असलेला सिंधुदुर्ग जिल्हा सर्वात कमी मतदारांचा जिल्हा आहे.

1 कोटी 82 लाख तरुण यंदा पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. यात 85 लाख तरुणींचा समावेश आहे. याआधी देशात २१ वर्ष पूर्ण झालेल्यांना मतदानाचा अधिकार होता, 1989 साली कायद्यात दुरुस्तीनंतर १८ वर्ष पूर्ण झालेल्यांना मतदानाचे अधिकार मिळाले. 85 वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना घरीच मतदानाची सोय केली जाणार आहे.

2019 लोकसभा निवडणुकीत भाजपनं ३०३, काँग्रेसनं ५२, डीएमकेनं २३, तृणमूलनं २२, शिवसेनेनं १८ जागा जिंकल्या होत्या. इतर पक्षांचे मिळून 124 जागा होत्या. गेल्या ३ लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढत राहिलाय. २००९ च्या लोकसभेवेळी ५८ टक्के मतदान झालं, २०१४ ला ६६ टक्के, तर २०१९ ला देशात ७० टक्के मतदान झालं होतं.

1999 साली म्हणजे साधारण दोन दशकांपूर्वी लोकसभेच्या आखाड्यात १६९ पक्ष मैदानात होते. गेल्यावेळी पक्षांची संख्या 669 होती. यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. 1952 साली देशात जेव्हा पहिल्यांदा निवडणूक झाली त्यावेळी 53 पक्ष होते. 2024 साली ७०० हून जास्त छोटे-मोठे पक्ष निवडणुकीत उतरणार आहेत.

गेल्या 5 निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर 1999 ला भाजपनं १८२ जागा होत्या, काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या.
2004 ला भाजप 138 तर काँग्रेस 145
2009 ला भाजप 116, काँग्रेस 206
2014 ला भाजप 282, काँग्रेस 44
2019 ला भाजप 303, तर काँग्रेसला 52 जागा मिळाल्या होत्या.

आचारसंहितेत लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींवर निर्बंध येतात., आणि आचारसंहिता म्हणजे काय.

1960 साली देशात पहिल्यांदा निवडणुकांत आचारसंहिता लागू झाली. निवडणुका स्वतंत्र आणि निष्पक्ष व्हाव्यात, यासाठी राजकीय पक्षांना घालून दिलेल्या नियमांना आचारसंहिता म्हटलं जातं. आचारसंहितेत सत्ताधाऱ्यांना कोणतीही घोषणा करता येत नाही. प्रकल्पांचं उद्घाटन वा भूमीपूजन करता येत नाही. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याची गंच्छती, बढती वा बदली करता येत नाही. निवडणूक प्रचारात सरकारी वाहनाच्या वापरावर बंदी येते. पक्ष वा उमेदवाराला धर्म-जात किंवा पथांच्या आधारे मतदानाचं आवाहन करता येत नाही.