अचानक वारं फिरलं… मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार? 24 आमदारांचा गुप्त प्लान; मागण्या काय?

जम्मू-काश्मीरमध्ये उमर अब्दुल्ला सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. 24 नाराज आमदारांनी गुप्त बैठक घेऊन मुख्यमंत्री, सल्लागार आणि काही मंत्र्यांना हटवण्याची मागणी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असलेल्या या आमदारांच्या बंडामुळे अब्दुल्लांची खुर्ची धोक्यात आली आहे. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास सरकार कोसळण्याची भीती आहे.

अचानक वारं फिरलं... मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार? 24 आमदारांचा गुप्त प्लान; मागण्या काय?
omar abdullah
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 31, 2026 | 11:53 AM

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार केल्याने पक्षामध्ये बंडाळी निर्माण झाली आहे. एक दोन नव्हे तर 24 आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधातच दंड थोपटले आहेत. या नाराज आमदारांनी काल रात्री उशिरा गुप्त मिटिंग घेतली. त्यात सीक्रेट प्लान ठरला आहे. त्यामुळे अब्दुल्ला यांचं टेन्शन वाढलं आहे. मुख्यमंत्र्यांचा सल्लागार, उपमुख्यमंत्री आणि काही मंत्र्यांना हटवण्याची मागणी या नाराज आमदारांनी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शुक्रवारी रात्री श्रीनगरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्सच्या 18 आमदारांनी बैठक घेतली होती. तर सहा आमदार हे व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित होते. या सहाही आमदारांनी नाराज आमदारांच्या गटाचं समर्थन केलं आहे. नाराज आमदारांमध्ये काश्मीर खोऱ्यातील आणि जम्मूतील दोन आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे आता नाराज आमदारांची संख्या 24 झाली आहे.

Loading...

अर्धे आमदार नाराज

जम्मू-काश्मीर विधानसभेत एकूण 90 सदस्य आहेत. यात नॅशनल कॉन्फ्रन्सचे 41 आमदार आहेत. उमर अब्दुल्ला यांना काँग्रेसच्या सहा आमदारांचं पाठबळ आहे. काही पक्ष आणि अपक्ष आमदारांनीही सरकार बनवण्यासाठी अब्दुल्ला यांना समर्थन दिलं आहे. मात्र, या 24 आमदाराचं बंड शांत नाही झालं तर अब्दुल्ला यांचं सरकार धोक्यात येऊ शकतं. विरोधक सरकार विरोधात अविश्वास ठराव आणण्याची मागणी करू शकतात. त्यामुळे उमर अब्दुल्ला यांची खुर्ची जाण्याची भीती आहे.

आम्हाला आमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे. मुख्यमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे, असं एका नाराज आमदाराने सांगितलं. आम्ही नाराज आहोत. पण पक्षाच्या विरोधात नाही, असं स्पष्ट करतानाच पण सर्व काही पहिल्या सारखं चालू शकत नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

कुठे झाली बैठक?

एनसीचे आमदार कैसर जमशेद लोन यांच्या निवासस्थानी काल ही बैठक झाली. या बैठकीत आमदारांनी एक प्रस्ताव पारित केला. त्यावर सर्वांनी सह्या केल्या. मुख्यमंत्र्यांचे सल्लागार नासिर असलम वानी यांना हटवण्याची आणि उपमुख्यमंत्री सुरेंद्र चौधरी यांच्यासहीत काही मंत्र्यांना हटवण्याची मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे. तसेच ज्या मंत्र्यांनी दोन वर्ष पूर्ण केले आहेत. त्यांना हटवून मंत्रिमंडळाचं पुनर्गठन करावं, अशी मागणीही यात करण्यात आली आहे. या बैठकीत काही आमदार भावूक झाले होते. पार्टी नेतृत्त्व आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या वागणुकीमुळे हे आमदार भावूक झाले होते.

खासदार देणार राजीनामा

दरम्यान, एनसीचे श्रीनगरमधील खासदार आगा रुहुल्लाह यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देणार असल्याची गोषणा त्यांनी केली आहे. रुहुल्लाह आणि अब्दुल्ला यांच्या गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने खटके उडत आहेत. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us