‘इंशाअल्लाह तो दिवस…’ ओवैसींच्या वक्तव्यावर देवकीनंदन ठाकूर म्हणाले, मग आमची पण एक इच्छा आहे की…

“इराणमध्ये महिला एकत्र येऊन हिजाब उतरवतात. मुस्लिम महिलांनाही हिजाब नकोय,कोणालाही पारतंत्र्य नकोय. पण ओवैसी अर्धसत्य बोलले, भारतामध्ये लोकसंख्येचे प्रमाण असंतुलित होत आहे. म्हणून हिंदूंनी एकजूट व्हावं, तरच हिंदू या देशावर राज्य करू शकतील”

इंशाअल्लाह तो दिवस... ओवैसींच्या वक्तव्यावर देवकीनंदन ठाकूर म्हणाले, मग आमची पण एक इच्छा आहे की...
devkinandan thakur-asaduddin owaisi
| Updated on: Jan 12, 2026 | 8:51 AM

धार्मिक नेते आणि कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी हिजाबवरील असदुद्दीन ओवैसींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जर ओवैसींची इच्छा असेल की, हिजाब परिधान करणारी महिला भारताची पंतप्रधान बनली पाहिजे, तर आमचं सुद्धा एक स्वप्न आहे, असं देवकीनंदन ठाकूर म्हणाले. “टिळा, भगवा कपडे परिधान करणारे लोक बांग्लादेश आणि पाकिस्तानात सत्तेमध्ये असावेत, हे आमचं स्वप्न आहे” असं देवकीनंदन ठाकूर म्हणाले. नुकतच महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी एक दिवस हिजाब परिधान करणारी महिला भारताची पंतप्रधान बनेल. “एकाच समाजाचा व्यक्ती देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपती बनेल असं पाकिस्तानच्या संविधानात लिहिलं आहे. पण भारताच्या संविधानात सर्व समाजाच्या लोकांचं एकच स्थान आहे. आपण तेव्हा नसू, पण एकदिवस असा येईल, जेव्हा हिजाब घालणारी मुलगी भारताची पीएम बनेल” असं असदुद्दीन ओवैसी सोलापुरच्या सभेत बोलले होते.

ओवैसींच्या वक्तव्यावर अनेकांनी कठोर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपसह अनेक राजकीय पक्ष त्यांच्या या मताशी सहमत नाहीयत. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी असदुद्दीन ओवैसींच्या वक्तव्याला बेजबाबदार ठरवलं. हैदराबादचा खासदार अर्धसत्य सांगतोय, असं ते म्हणाले. ‘असदुद्दीन ओवैसी चेकाळलाय’ असं ते म्हणाले. “इराणमध्ये महिला एकत्र येऊन हिजाब उतरवतात. मुस्लिम महिलांनाही हिजाब नकोय,कोणालाही पारतंत्र्य नकोय. पण ओवैसी अर्धसत्य बोलले, भारतामध्ये लोकसंख्येचे प्रमाण असंतुलित होत आहे. म्हणून हिंदूंनी एकजूट व्हावं, तरच हिंदू या देशावर राज्य करू शकतील” असं अनिल बोंडे म्हणाले.

तो फार काळ चालणार नाही

“पाकिस्तानच्या संविधानानुसार एकाच समाजाचा व्यक्ती देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपती बनू शकतो. पण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार, भारतात कुठलाही नागरिक महापौर, राज्याचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनू शकतो. इंशाअल्लाह तो दिवस जरुर येईल, जेव्हा ना मी किंवा आजची पिढी जिवंत नसेल, पण हिजाब परिधान करणारी मुलगी भारताची पंतप्रधान बनेल” असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले. सत्ताधारी पार्टीला टोला लगावताना ओवैसी म्हणाले की, “मु्स्लिमांविरोधात हा जो द्वेष पसरवला जातोय, तो फार काळ चालणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे, तो दिवस जरुर येईल”