
भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच याबाबत घोषणा केली होती, भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये यासाठी अमेरिकेकडून सातत्यानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, सध्या अमेरिकेत भारताच्या वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ आकारण्यात येत आहे. याचदरम्यान अमेरिकेच्या वाणिज्य विभागाचे सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
त्यांनी भारत आणि ब्राझीलच्या व्यापारी धोरणांवर टीका करताना, मोठी मागणी केली आहे. अमेरिकेच्या व्यापारी हिताला नुकसान पोहोचणार नाही, याची काळजी घेत भारत आणि ब्राझील यांनी आपल्या बाजारपेठा अमेरिकेसाठी खुल्या कराव्यात असं हॉवर्ड लुटनिक यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या टॅरिफ दबावानंतरही भारताची रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच आहे, यावर देखील यावेळी लुटनिक यांनी टीका केली आहे. भारत रशियाकडून कमी किमतीमध्ये कच्च्या तेलाची खरेदी करतो हे हास्यास्पद आहे, भारताला आता हे ठरवावं लागेल की ते कोणाच्या बाजुने आहेत? कोणत्या पक्षात आहेत? असंही यावेळी लुटनिक यांनी म्हटलं आहे.
आमच्याकडे असे अनेक देश आहेत, जसे की स्वित्झर्लंड, ब्राझील आणि भारत या देशांना अमेरिकेच्या प्रतिसादाला योग्य प्रतिसाद देण्याची खरोखरच गरज आहे. आता वेळ आली आहे, या देशांनी ज्यामुळे अमेरिकेला हानी पोहोचले अशा कृती थांबवाव्यात आणि अमेरिकेसाठी आपली बाजारपेठ ओपन करावी असंही यावेळी अमेरिकेच्या वाणिज्य विभागाच्या सचिवांनी म्हटलं आहे.
यासोबतच त्यांनी आणखी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. भारत आणखी एक -दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा अमेरिकेसोबत चर्चेला तयार होईल, कारण भारतामधील व्यापारी कंपन्या तसं करण्यासाठी भारतामधील नरेंद्र मोदी सरकारवर दबाव निर्माण करतील असंही यावेळी हॉवर्ड लुटनिक यांनी म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे भारतानं आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे, आमच्यासाठी राष्ट्रहीत सर्व प्रथम आहे, त्यामुळे अमेरिकेच्या कृषी उत्पादनाला भारतात एन्ट्री मिळणार नाही, असं भारतानं म्हटलं आहे.