
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सध्या लोकसभेत पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा सुरु आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देत आहेत. या विशेष चर्चेसाठी 16 तासांचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. लोकसभेत बोलताना राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानवर केलेल्या कारवाईची संपूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
ऑपरेशन सिंदूर का थांबवलं?
भारत आणि पाकिस्तामध्ये युद्धबंदी झाल्यानंतर ऑपरेशन सिंदूर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर विरोधकांनी दबावाखाली हे ऑपरेशन थांबल्याचे म्हटले होते. यावर बोलताना राजनाथ सिंग म्हणाले की, भारताने हे ऑपरेशन थांबवले कारण आम्ही निश्चित केकेले टार्गेट सैन्याने साध्य केले होते. भारताने दबावाखाली हे ऑपरेशन थांबवले हे चूकीचे आहे. ऑपरेशन सिंदूरचा उद्देश पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांना नष्ट करणे हा होता. या ऑपरेशनचा उद्देश युद्ध करणे नव्हता.
… तर पुन्हा सिंदूर ऑपरेशन सुरु होणार
राजनाथ सिंग यांनी पुढे बोलताना म्हटले की, ’10 मे रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई तळावर हल्ला केला होता, त्यावेळी पाकिस्तानने माघार घेतली. पाकिस्तानने आपल्या डीजीएमओशी बोलून, महाराज, आता थांबा अशी विनंती केली होती. मात्र सैन्याने आपले टार्गेट पूर्ण केले होते, त्यामुळे ऑपरेशन स्थगित करण्यात आले आहे. आगामी काळात जर पाकिस्तानने कुरापती केल्या तर ऑपरेशन पुन्हा सुरू होईल.’ असा इशारा राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला दिला आहे.
पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले – राजनाथ सिंग
राजनाथ सिंग पुढे बोलताना म्हणाले की, ‘पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर हल् करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आम्ही हे हल्ले हाणून पाडले. आमची ही कारवाई स्वसंरक्षणार्थ होती. 7 ते 10 मे रात्री 1.0 वाजेपर्यंत पाकिस्तानने क्षेपणास्त्रे आणि लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर करुन हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारताच्या संरक्षण यंत्रणेने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला हाणून पाडला. पाकिस्तान भारतात कोणत्याही ठिकाणी हल्ला करु शकला नाही. भारतीय सैन्याने शत्रूचा प्रत्येक डाव उधळून लावला. आमच्या सैन्याने हे मिशन यशस्वीरित्या पार पाडले.’