राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वसमावेशक उमेदवार देणार; विरोधकांची दिल्लीत महत्वपूर्ण बैठक; शरद पवारांनी दिला नकार; नाव निश्चित नाही

| Updated on: Jun 15, 2022 | 7:09 PM

देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची अशी ही बैठक दीर्घ काळानंतर झाली आहे. त्यामुळे या बैठकीतून चांगलाच निर्णय निघणार असल्याचेही टीएमसीच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वसमावेशक उमेदवार देणार; विरोधकांची दिल्लीत महत्वपूर्ण बैठक; शरद पवारांनी दिला नकार; नाव निश्चित नाही
विरोधी पक्षातील नेत्यांची दिल्लीत बैठक
Image Credit source: ANI
Follow us on

नवी दिल्ली: राष्ट्रपती पदाची 18 जुलै रोजी निवडणूक (Presidential election on July 18) होत असल्याने देशातील राजकीय घडामोडींना आत वेग आला आहे. या निवडणुकीसाठी भाजप विरोधी गटांनी (BJP opposition Party) एकमताने सर्वसमावेशक उमेदवार उभा करण्याचा निर्णय दिल्लीत झालेल्या बैठकीत (Delhi Meeting) घेण्यात आला. दिल्लीतील या बैठकीत देशातील विविध पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून नकार दिला आहे. यावेळी झालेल्या बैठकीत आम्ही एकच सर्वसमावेशक उमेदवार निवडून देऊ असा ठराव करून त्या उमेदवाराला सर्वपक्षीय पाठिंबा असेल असेही सांगण्यात आले.

याविषयी आणखी काही पक्षांबरोबर आम्ही चर्चा करु, सल्लामसलत करु आणि चांगला निर्णय घेऊ असंही या बैठकीत ठरवण्यात आले. देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची अशी ही बैठक दीर्घ काळानंतर झाली आहे. त्यामुळे या बैठकीतून चांगलाच निर्णय निघणार असल्याचेही टीएमसीच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

तो उमेदवार संविधान रक्षक असेल

दिल्लीत विरोधी पक्षातील महत्वाच्या नेत्यांच्या झालेल्या या बैठकीत आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एक सर्वसमावेशक उमेदवार उभा करण्याचा ठराव करण्यात आला आहे. विरोधकांकडून जो उमेदवार निवडला जाणार असून तो उमेदवार संविधान रक्षक म्हणूनही काम करणार आहे, तसेच मोदी सरकारपासून भारतीय लोकशाही आणि भारताच्या सामाजिक सहसंबंध आणि सलोखा बिघडणार नाही आणि लोकशाहीचे संरक्षण करणाराच हा उमेदवार असेल असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल,सुधींद्र कुलकर्णी हे या बैठकीत सहभागी झाले नाहीत.

बैठकीत 17 पक्ष सहभागी

यावेळी या बैठकीत सहभागी असलेले सीपीआयचे खासदार बिनॉय विश्वम यांनी सांगितले की, ममता बनर्जी यांनी विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र हा प्रस्ताव स्वतः शरद पवारांना मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. ममता बॅनर्जी यांनी येथे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या विरोधात संयुक्त उमेदवार देण्यासाठी बोलावलेल्या या विरोधी पक्षांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत 17 राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीवेळी टीएमसी, काँग्रेस, सीपीआय, सीपीआय (एम), सीपीआयएमएल, आरएसपी, शिवसेना, एनसीपी, आरजेडी, एसपी, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, जेडी(एस), डीएमके, आरएलडी, आययूएमएल आणि जेएमएम आदी पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीत सहभागी झाले होते.

तेलंगणा राष्ट्र समितीचा उमेदवार गैरहजर

राष्ट्रपती निवडणुकीसाठी बोलवलेल्या या 17 पक्षांच्या बैठकीली तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा राष्ट्र समितीने (TRS) एकही प्रतिनिधी पाठवण्यात आला नाही. राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.