Pahalgam Attack: “तुम्ही मोदीला डोक्यावर चढवलंय..”; पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळ्या झाडताना काय म्हणाले दहशतवादी?

मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण काश्मीरमधील बैसरन टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. 40 पर्यटकांना घेरून त्यांना लक्ष्य केलं. तिथं जाण्यासाठी अरुंद वाट असल्याने पर्यटकांना आडोशाला जाण्याची संधी मिळाली नाही.

Pahalgam Attack: तुम्ही मोदीला डोक्यावर चढवलंय..; पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळ्या झाडताना काय म्हणाले दहशतवादी?
pahalgam terror attack
Image Credit source: ANI
| Updated on: Apr 23, 2025 | 12:23 PM

काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला पहलगाममधील ‘छोटं स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी झाला. यावेळी अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात किमान 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये डोंबिवलीचे तिघे तर पनवेलमधील एकाचा समावेश आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. पुण्यातील पर्यटक आसावरी जगदाळे यांनी या हल्ल्याचं धक्कादायक वर्णन एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केलं. “गोळीबार झाल्यानंतर आम्ही भीतीने तंबूत शिरलो. त्यांनी माझे 54 वर्षीय संतोष यांना बाहेर बोलावून कुराणातील ओळी (कलमा) म्हणण्यास सांगितलं. त्यांनी जेव्हा म्हटल्या नाहीत तेव्हा त्यांना डोक्यात, पाठीत आणि कानात गोळ्या घातल्या,” असं आसावरी यांनी सांगितलं. तसंच तुम्ही मोदींना पाठिंबा देता असं सांगत गोळ्या झाडल्याचं त्यांनी नमूद केलं.

याविषयी त्या पुढे म्हणाल्या, “हल्लेखोरांचा वेश स्थानिक पोलिसांप्रमाणेच होता. संरक्षणासाठी आम्ही शेजारच्या तंबूत गेलो. आम्हाला सुरुवातीला दहशतवादी आणि सुरक्षारक्षक यांच्यात ही चकमक सुरू आहे असं वाटलं. दहशतवाद्यांच्या गटाने सुरुवातील शेजारच्या तंबूत येत गोळीबार केला. त्यानंतर आमच्या तंबूकडे येत माझ्या वडिलांना, चौधरी तू बाहर आ जा असं दरडावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत असल्याबद्दल शेरेबाजी केली. तुम्ही लोकांनी मोदीला डोक्यावर चढवून ठेवलंय, त्याच्यामुळे आमचा धर्म धोक्यात आहे, असं ते म्हणाले. त्याचसोबत काश्मिरी दहशतवाद निरपराध महिला आणि मुलांना ठार मारत नाहीत, असा दावा त्यांनी केला. त्यांनी अनेक पुरुषांना गोळ्या घातल्या. तिथे मदतीसाठी कोणीही नव्हतं. पोलीस आणि लष्कराचे जवान 20 मिनिटांनी मदतीसाठी आले.”

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचं वृत्त समजताच सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री मायदेशी प्रयाण केलं. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी मोदी मंगळवारी सकाळी सौदी अरेबियात दाखल झाले होते. मात्र काश्मीरमधील हल्ल्याचं वृत्त समजताच मंगळवारी रात्री पंतप्रधानांनी पुढील दौरा रद्द करून मायदेशी प्रयाण केलं. या हल्ल्याची त्यांनी कठोर शब्दांत निंदा केली. ‘त्यांना (दहशतवाद्यांना) माफी नाही. त्यांचे दृष्ट हेतून कधीही सफल होणार नाहीत. दहशतवादाविरोधी लढ्याचा आमचा निर्धार अभेद्य आहे आणि तो दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे. पीडितांना सर्व प्रकारची मदत मिळेल अशी हमी देतो’, अशी पोस्ट मोदींनी लिहिली.