
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड म्हटला जाणारा सैफुल्ला कसुरी पहिल्यांदाच खुलेआम फिरताना दिसला आहे. पाकिस्तानमध्ये एका सभेत भाषण करतानाचे त्याचे फोटो समोर आले आहेत. सैफुल्ला हा लष्कर ए तौयबा या दहशतादी संघटनेचा कमांडर आहे. भारतविरोधी रॅलीमध्ये तो दिसून आल आहे.
विशेष म्हणजे सैफुल्ला कसुरी ज्या रॅलीत दिसून आला. ती रॅली पाकिस्तान मर्कजी मुस्लीम लीग (पीएमएमएल) या पक्षातर्फे आयोजित करण्यात आली होती. कसुरी याच्यासोबत यावेळी हाफीज सईदचा मुलगा थला सईद हादेखील यावेळी दिसून आला आहे. हाफीजच्या मुलाला लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा उत्तराधिकारी मानले जाते. या रॅलीमध्ये काही पाकिस्तानी नेतेदेखील होते.
पाकिस्तामध्ये यशस्वी झालेल्या अणुचाचणीचा दिवश दरवर्षी यौम ए तकबीरच्या रुपात साजरा केला जातो. सैफुल्ला ज्या रॅलीमध्ये दिसून आला ती रॅली याच दिवसाच्या कार्यक्रमाचा एक भाग होती. या रॅलीत सहभागी असलेला कसुरी हा पहलगाम हल्ल्याचे नेतृत्त्व करत होता, असे म्हटले जाते. या रॅलीत बोलताना कसुरीने भारताविरोधात गरळ ओकली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मी मास्टरमाईंड असल्याचे बोलले जाते. आता माझे नाव जगभरात प्रसिद्ध झाले आहे, असे फुत्कार कसुरीने काढले.
पाकिस्तानात आयोजित करण्यात आलेल्या भारतविरोधी रॅलीमध्ये यावेळी तल्हा सईद याने जिहादी नारेबाजी केली आहे. तल्हा सईद याचा मोस्ट वॉटेंड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश आहे. त्याने याआधी निवडणूक लढवलेली आहे. तसेच तो पीएमएमएल या पाकिस्तानी राजकीय पक्षाशीही संबंधित आहे. गेल्या काही दिवसांत त्याने पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागांत भारतविरोधी रॅलींचे आयोजन केलेले आहे. तसेच त्याने या सभांमध्ये हाफीज सईदची सुटका करा, असी मागणी केलेली आहे.