
पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना त्यांच्या देशात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. पाकिस्तानने भारतासोबत व्यापारावर बंदी घातली आहे, तसेच भारतासाठी हवाई हद्द देखील बंद केली आहे.
दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे, अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेची भूमिका काय असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागंलं होतं. मात्र अमेरिकेनं तटस्थ भूमिका घेतली आहे. भारत -पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश आम्हाला जवळचे आहेत. त्यांच्यामध्ये नेहमीच तणाव राहिला आहे, मात्र ते यावर तोडगा काढतील.
त्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यानं देखील मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव आहे, आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. दोन्ही देशांनी यावर चर्चेनं मार्ग काढावा असं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉम ब्रूस यांनी म्हटलं आहे. मात्र अमेरिकेची ही भूमिका पाकिस्तानच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी अमेरिकेच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आम्ही गेल्या 30 वर्षांमध्ये अमेरिकेसाठी अनेक वाईट काम केली’ असा मोठा गौप्यस्फोट पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी केला आहे. तर यावर उत्तर देणं अमेरिकेनं टाळलं आहे, यावर भूमिका स्पष्ट करताना आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.
दुसरीकडे आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत, आमचे परराष्ट्र मंत्री लवकरच दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधतील. चर्चेनं या प्रश्नावर तोडगा काढावा, इतर देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देखील या प्रश्नावर भारत , पाकिस्तानशी बोलावं यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.