
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीतील घडामोडी चांगल्याच वाढल्या आहेत. तेथे अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे या बैठकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तसेच इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्ती हजेरी लावत आहेत. त्यामुळेच आगामी काही दिवसांत काहीतरी मोठं होणार आहे? असा अंदाज लावला जात आहे. असे असतानाच आता मोठी माहिती समोर येत आहे. नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास दाखवला असून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ आणि टार्गेट ठरवा, असं मोदींनी सांगितल्याचं म्हटलं जात आहे.
दिल्लीत आज मोठ्या घडामोडी घडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला भारताच्या तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीला भारताचे राष्ट्रायी सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही उपस्थिती होती. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत भारताची सुरक्षा, पाकिस्ताकडून केली जाणारी कारवाई, भारतीय सैन्याची पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठीची तयारी अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यावर पूर्णपणे विश्वास दाखवला आहे. तसेच पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तुम्ही वेळ ठरवा, टार्गेट ठरवा असे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे आता भारतीया सैन्य नेमकी काय कारवाई करणार? भारताने कारवाई केलीच तर पाकिस्तान त्याला नेमकं कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
साधारण एक तास ही बैठक झाली आहे. या बैठकीत सरकारने लष्कराला पूर्ण सूट दिली आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणे हा राष्ट्रीय संकल्प आहे, असे मोदींनी या बैठकीला सांगितले. तसेच वेळ आणि टार्गेट सेनेने ठरवावे त्यात कोणीही हस्तक्षेप करणार नाही, असंही या बैठकीत मोदी यांनी सांगितले आहे. ही बैठक झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. आता मोदी आणि शाहा यांच्यात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे काहीतरी मोठा निर्णय होऊ शकतो, असा अंदाज लावला जात आहे.