
Pahalgam Terror Atttack : पहलगाममधील हल्ल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. 22 एप्रिलनंतर दिल्लीमध्ये आतापर्यंत अनेक मोठ्या बैठका झाल्या आहेत. या बैठकात भारताने पाकिस्तानविरोधात अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, तिन्ही दलाचे प्रमुख एकत्र आले असून महत्त्वाच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखील महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला भारताचे भूदल, नौदल आणि वायुदल अशा तिन्ही दलाचे प्रमुख अपस्थित आहेत. यासह या बैठकील संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही उपस्थिती आहे. विशेष म्हणजे या बैठकीला केंद्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेदेखील हजर आहेत. या प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत पहलगाममधील हल्ला, भारतीय सेनेची तयारी आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय सेनेच्या तयारीचाही आढावा घेत आहेत. याआधीच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आमची सेना पाकिस्तानला उत्तर देण्यास सज्ज आहे, असे सांगितले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय सेनेकडून युद्धाभ्यास चालू आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच मोदी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये होत असलेल्या या बैठकीला मोठे महत्त्व आले आहे.
भारताने हल्ला केल्यास आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ, असा पवित्रा पाकिस्तानने घेतलेला आहे. त्यामुळे दोन्ही देश युद्धासाठी सज्ज असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनीदेखील भारत-पाकिस्तान युद्धासंबंधी मोठं विधान केलं आहे. आगामी चार दिवसांत युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे, असा दावाच त्यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही देशांत युद्ध चालू होणार का? असे विचारले जात आहे. नरेंद्र मोदी या बैठकीत याबाबतचा काही फायनल कॉल घेणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.