डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत गुपचूप उरकली सर्वात मोठी डील, जगभरात खळबळ

पाकिस्तानने अमेरिकेला मोठी भेट दिली आहे, पाकिस्तान आणि अमेरिकेमध्ये गुपचूप एक मोठी डील झाली असून, या डीलमुळे जगभरात खळबळ उडाली आहे, अनेक देशांचं टेन्शन वाढलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत गुपचूप उरकली सर्वात मोठी डील, जगभरात खळबळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 06, 2025 | 9:55 PM

पाकिस्तानने अमेरिकेला मोठी भेट दिली आहे, पाकिस्तानने अमेरिकेला दुर्मिळ खनिजांची पहिली खेप पाठवली आहे, ज्यामध्ये निओडायमियम आणि प्रासियोडायमियम या खनिजांसह अँटिमनी आणि कॉपर कॉन्सन्ट्रेट यांचा देखील समावेश आहे. पाकिस्तान सरकारने केलेल्या या खनिजाच्या निर्यातीला पाकिस्तानमधूनच मोठा विरोध होत आहे. या प्रकरणात विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफ (पीटीआय ) कडून सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सरकारने संसदेत प्रस्ताव मंजूर न करताच अमेरिकेसोबत सीक्रेट डील केल्याचं म्हटलं आहे.

शहबाज शरीफ सरकारने या करारासंदर्भातील सर्व माहिती सर्वाजनिक करावी अशी माहिती पीटीआयकडून करण्यात आली आहे. आठ सप्टेंबर रोजी अमेरिकेची कंपनी असलेल्या यूनायटेड स्टेट्‍स स्टॅटेजिक मेटल्स आणि पाकिस्तानची कंपनी फ्रंटियर वर्क्स ऑर्गेनाइजेशन यांच्यामध्ये एक डील झाली होती. या डीलवेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि आर्मी चीफ असीम मुनीर दोघेही उपस्थित होते. या करारानुसार आता पाकिस्तान अमेरिकेला तांबे, सोने, पोलाद या सारख्या दुर्मिळ खनिजांची निर्यात करणार आहे. त्याचसोबत पाकिस्तानमध्ये उत्खनन करण्याचा परवाना देखील अमेरिकन कंपनीला देण्यात येणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि आर्मी चीफ मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वॉसिंगटनमध्ये भेट घेतली होती. या भेटीवेळी शरीफ आणि मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दुर्मिळ खनिजांनी भरलेला एक बॉक्स गिफ्ट केला होता, ज्यामध्ये रेअर अर्थ खनिजांचा समावेश होता.पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या दोन प्रांतामध्ये दुर्मिळ खनिजांच्या खानी आहेत, मात्र या डीलमुळे हा खनिजांचा खजाना अमेरिकेसाठी ओपन होणार आहे. दुर्मिळ खनिजं निर्यात करण्याचा करार पाकिस्तानने अमेरिकेसोबत केला आहे, सोबतच त्यांनी अमेरिकेला आपल्या देशात उत्खनन करण्याची देखील परवानगी दिली आहे. या डीलमुळे आता अमेरिकेला मोठा फायदा होणार आहे. अमेरिकेला आता थेट रेअर खनिजांच्याबाबतीत चीनसोबत स्पर्धा करता येणार आहे. दुसरीकडे मात्र या डीलमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.