
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला, यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतला तसेच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवण्याच्या प्रयत्नावर देखील यावेळी चर्चा झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चांगला संवाद झाला. यावेळी आम्ही भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतला तसेच त्यावर आम्ही सकारात्मक चर्चा केली. युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरूच आहे, हा संघर्ष संपवण्यासाठीच्या प्रयत्नावर आणि इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर देखील यावेळी चर्चा झाली. जागतिक शांतता आणि स्थौर्य वाढवण्यात भारत -फ्रान्सची धोरणात्मक भागीदारी महत्त्वाची भूमिका बजावत राहील, असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
Had a very good conversation with President Macron. We reviewed and positively assessed the progress in bilateral cooperation in various areas. Exchanged views on international and regional issues, including efforts for bringing an early end to the conflict in Ukraine. The…
— Narendra Modi (@narendramodi) September 6, 2025
दरम्यान त्यापूर्वी युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर दोन दिवसांनी आता इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरद्धनीवरून संवाद साधला आहे. यावेळी बोलताना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, यावर शांततेच्या मार्गानं तोडगा निघावा यासाठी दबाव आणण्यात भारताची भूमिका महत्त्वाची आहे. तर दुसरीकडे वॉन डेर लेयन यांनी म्हटलं होतं की, युक्रेनचे “राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत भारताच्या सततच्या सहकार्याच्या भूमिकेचं आम्ही मनापासून स्वागत करतो. रशियाला युक्रेनमधील आक्रमक युद्ध आता संपवावं लागेल.
दरम्यान रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे, हे युद्ध थांबवावं यासाठी अमेरिकेकडून देखील प्रयत्न सुरू आहेत, ट्रम्प यांच्याकडून युक्रेन आणि रशियावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र ट्रम्प यांचे हे प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे या युद्धावर शांततेच्या मार्गानं तोडगा निघावा अशी भारताची भूमिका आहे, त्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत.