
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपद रिकामं झालं आहे. आता उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. भाजपप्रणित एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल आणि तामिळनाडूचे ज्येष्ठ नेते सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. तर विरोधकांनी बी सुदर्शन रेड्डी यांना उमेरवारी जाहीर केली आहे. या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशातच आता मतदानाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी खेळी खेळली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती पदासाठी 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मतदानाआधी एक दिवस म्हणजे 8 सप्टेंबर एनडीएच्या सर्व खासदारांना जेवणासाठी आमंत्रित केले आहे. यावेळी एनडीएच्या एकतेचा आणि ताकदीचा संदेश दिला जाणार आहे. तसेच मतदानाबाबत काही सूचनाही केल्या जाण्याची शक्यता आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, एनडीएने आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी खास तयारी केली आहे. मतदानाबाबत खासदारांना 3 दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे.यासाठी सर्व एनडीए खासदार 6 ते 8 सप्टेंबर या कालावधीत दिल्लीत असणार आहेत. या प्रशिक्षणात मतदान कसे करायचे हे देखील सांगितले जाणार असल्याचे समोर आले आहे.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होते. मतदान करताना खासदारांना अडचण येऊ नये म्हणून एनडीएने हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. सीपी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी व्हावेत यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. त्याबरोबर इंडिया आघाडीत नसलेल्या विरोधी खासदारांसोबतही संपर्क साधला जात आबे. बीजेडी, वायएसआरसीपी आणि बीआरएस या पक्षांची मते एनडीए उमेदवाराला मिळवण्यासाठी हा प्रयत्न आहे.
सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूतील भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन आहे. राधाकृष्णन यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 रोजी तामिळनाडूतील तिरुपूर येथे झाला. त्यांनी कोइम्बतूर येथील चिदंबरम कॉलेजमधून बीबीए केले आहे. राधाकृष्णन 1973 मध्ये वयाच्या 1 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले. कालांतराने ते जनसंघात सामील झाले आणि सक्रिय राजकारणात आले. ते सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.