पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आईला खांदा, हीरा बा अनंतात विलिन…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या पार्थिवाला अग्नि दिला. हीराबेन मोदी अनंतात विलिन...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आईला खांदा, हीरा बा अनंतात विलिन...
| Updated on: Dec 30, 2022 | 10:27 AM

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं निधन (PM Narendra Modi Mother Hiraben Modi Passed Away) झालं.वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकतंच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 100 वर्षांचा एक संघर्षमय प्रवास आज थांबला…

हीरा बा अनंतात विलिन…

हीराबेन यांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या पार्थिवाला अग्नि दिला. हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार हीरा बा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हीरा बा यांच्या पार्थिवाला अग्नि देण्यात आला तेव्हा अनेकांना अश्रू अनावर झाले.

मोदींनी दिला खांदा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळी वेळाआधीच गुजरातमधील त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी आपल्या आईला पुष्पचक्र अर्पण केलं. आईला अखेरचं अभिवादन केलं. हिराबेन यांची अंतयात्रा निघाली तेव्हा नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपल्या आईला खांदा दिला.

हिराबेन यांना अंतयात्रेवेळी ज्या अॅम्ब्युलन्समधून नेण्यात आलं त्यात नरेंद्र मोदीदेखील बसलेले होते.

हीरा बा यांच्या पार्थिवावर गांधीनगरच्या सेक्टर 30 स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हीराबेन यांच्या अंत्यसंस्कारावेळी केवळ कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. कोणत्याही राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी येण्यास मज्जाव करण्यात आला. कारण ही एक कौटुंबिक भावना आहे. त्यामुळे कुणी येऊ नये, असं आवाहन मोदी कुटुंबाकडून करण्यात आलं.

प्रत्येकाने आपलं काम करत राहावं. त्यात कोणताही व्यत्यय आणू नये, आपलं काम करत राहणं हीच हीरा बा यांना श्रद्धांजली असेल, असं आवाहन मोदी कुटुंबाने केलं आहे.

हीराबेन यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. याच वर्षी 18 जून रोजी हीराबेन यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केलं होतं. नुकतंच झालेल्या गुजरात निवडणुकीत त्यांनी मतदान केलं होतं.

हीराबेन यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे. हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.