‘आता तर विरोधकही म्हणत आहेत की, NDA सरकार 400 पार’, मोदींची तुफान फटकेबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. यावेळी त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा पहिल्यांदा हक्क बजवणाऱ्या तरुणांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं.

आता तर विरोधकही म्हणत आहेत की, NDA सरकार 400 पार, मोदींची तुफान फटकेबाजी
| Updated on: Feb 18, 2024 | 3:29 PM

नवी दिल्ली | 18 फेब्रुवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “आज विरोधी पक्षाचे नेतेदेखील एनडीए सरकार 400 पारचे नारे लावत आहेत”, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला. “एनडीएला 400 पार करण्यासाठी भाजपला 370 जागांचा माईलस्टोन पार करावाच लागेल. आम्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी माणसं आहोत. शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्यभिषेक झाला तेव्हा त्यांनी सत्ता मिळाली त्याचा आनंद घ्यावा असं केलं नाही. त्यांनी आपलं मिशन सुरुच ठेवलं. मी आपल्या सुख वैभवासाठी जीवन जगणारा व्यक्ती नाही. मी भाजप सरकारचा तिसरा टर्म, सत्ता भोगण्यासाठी मागत नाहीय. मै राष्ट्राचा संकल्प घेऊन निघालेला व्यक्ती आहे”, असं मोदी म्हणाले.

“भाजपचा कार्यकर्ता वर्षाच्या प्रत्येक दिवशी, 24 तास देशाच्या सेवेसाठी काही ना काही करत असतो. पण आता पुढचे 100 दिवस नवी ऊर्जा, नवा उत्साह, नवा विश्वास आणि जोशात काम करायचं आहे”, असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. “आज 18 फेब्रुवारी आहे आणि जे तरुण वयाच्या 18 व्या टप्प्यावर पोहोचले आहेत, ते पहिल्यांदा 18 व्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार आहेत. देशाच्या सेवेसाठी सर्वात जास्त जागा भाजपलाच मिळणार. पुढचे 100 दिवस सर्वांना एकत्र यायचं आहे. प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक वर्ग, समाज, पंथ, परंपरा सर्वांपर्यंत पोहोचायचं आहे. आपल्याला सर्वांचा विश्वास संपादीत करायचा आहे. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात या दोन दिवसात जी चर्चा झालीय ती देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘आता देश लहान स्वप्न पाहू शकत नाही’

“भारताने गेल्या 10 वर्षात जी गती मिळवली आहे, मोठ्या लक्ष्याला प्राप्त करण्यासाठी जे धैर्य मिळवलं आहे ते अभूतपूर्व आहे. भारताने प्रत्येक क्षेत्रात यश संपादीत केलं आहे. या यशाला प्रत्येक भारतीयाला एका मोठ्या संकल्पाशी जोडलं आहे. हा संकल्प विकसित भारताचा आहे. आता देश लहान स्वप्न पाहू शकत नाही आणि छोटे संकल्प करु शकत नाही. आता स्वप्नही विराट असतील आणि संकल्पही विराट असतील. भारताला विकसित करायचं हे आपलं स्वप्न आणि संकल्प आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.