पंतप्रधान मोदींचे 26 दिवसातील चौथे संबोधन, लॉकडाऊनबाबत काय घोषणा? देशाचं लक्ष

बहुतांश राज्यांनी मुदतवाढ करण्याची विनंती केल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर लॉकडाऊन दोन आठवडे वाढण्याची दाट शक्यता आहे. (PM Narendra Modi speech on last day of Lock down)

पंतप्रधान मोदींचे 26 दिवसातील चौथे संबोधन, लॉकडाऊनबाबत काय घोषणा? देशाचं लक्ष

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (14 एप्रिल) सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस आहे. ‘कोरोना व्हायरस’चा वाढता प्रादुर्भाव पाहता मोदी लॉकडाऊनची मुदत वाढवणार, टप्प्याटप्प्याने उठवणार की प्रत्येक राज्यावर निर्णय सोपवणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. गेल्या 26 दिवसातील मोदींचे हे पंतप्रधान म्हणून चौथे संबोधन आहे. (PM Narendra Modi speech on last day of Lock down)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये लॉकडाऊन महिनाअखेरपर्यंत वाढवण्यात आला आहे. बहुतांश राज्यांनी मुदतवाढ करण्याची विनंती केल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर लॉकडाऊन दोन आठवडे वाढण्याची दाट शक्यता आहे.

लॉकडाऊनचा दुसरा टप्पा कसा असेल ?

दुसऱ्या टप्प्यात कोणते निर्बंध असतील, आणि कशामध्ये शिथिलता येईल, मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्राकडून कोणत्या घोषणा होणार, ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी काय उपाययोजना आखल्या जाणार, आरोग्य सुविधांबद्दल कोणते बदल केले जाणार, गरिबांना धान्य पुरवठा सुलभतेने कसा होणार, मजूर, असंघटीत क्षेत्रातील कामगार, बेरोजगार यांच्यासाठी कोणतं पॅकेज असणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मोदींच्या भाषणात मिळण्याची आशा आहे.

देशातील ‘कोरोना’ हॉटस्पॉटमधील निर्बंध अधिक कठोर होण्याची शक्यता आहे. तर प्रादुर्भाव कमी असलेल्या राज्यात टप्प्याटप्प्याने ते शिथील होण्याची चिन्ह आहेत. संपूर्ण देशात लॉकडाऊन वाढणार की प्रत्येक राज्यावर निर्णय सोपवला जाणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कोरोनाच्या संसर्गाच्या तीव्रतेवर आधारित जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्याचा प्रस्ताव आहे. जवळजवळ 400 जिल्हे ग्रीन झोनमध्ये असू शकतात. तिथे सोशल डिस्टन्सिंग लक्षात ठेवून कृषी, बांधकाम आणि उत्पादन कामे सुरु करता येतील. (PM Narendra Modi speech on last day of Lock down)

पंतप्रधान मोदींचे 26 दिवसातील चौथे संबोधन

1. 19 मार्च – 29 मिनिटांचे भाषण, 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन, टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचे आवाहन
2. 24 मार्च – 29 मिनिटांचे भाषण, 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा
3. 3 एप्रिल – 12 मिनिटांचा व्हिडीओ संदेश, 5 एप्रिलला 9 वाजता 9 मिनिटे दीपत्कार करण्याचं आवाहन
4. 14 एप्रिल – आज काय बोलणार?

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मला कधीही सल्ले द्यावे, मी 24 तास उपलब्ध आहे, असे पंतप्रधान मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत म्हणाले होते. केंद्र सरकारने वैद्यकीय उपकरणे आणि आर्थिक मदतही द्यावी, अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली होती. (PM Narendra Modi speech on last day of Lock down)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *