पंजाबमध्ये राजकीय भूकंप! नवज्योत सिंह सिद्धूसह काँग्रेसच्या 5 नेत्यांचा राजीनामा

| Updated on: Sep 28, 2021 | 10:58 PM

पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी पदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर पक्षाचे राज्यातील कोषाध्यक्ष गुलजार इंदर चहल आणि कॅबिनेट मंत्री रजिया सुल्ताना यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर लगेच पंजाब काँग्रेसचे महासचिव योगिंदर धिंगरा आणि पंजाब काँग्रेसचे महासचिव (प्रभारी प्रशिक्षण) गौतम शेठ यांनीही पदाचा राजीनामा देऊ केलाय.

पंजाबमध्ये राजकीय भूकंप! नवज्योत सिंह सिद्धूसह काँग्रेसच्या 5 नेत्यांचा राजीनामा
Follow us on

नवी दिल्ली : पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलानंतरही राजकीय घडामोडी थांबण्याचं नाव घेत नाहीत. आज तर पंजाबमध्ये राजकीय भूकंप पाहायला मिळाला. पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी पदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर पक्षाचे राज्यातील कोषाध्यक्ष गुलजार इंदर चहल आणि कॅबिनेट मंत्री रजिया सुल्ताना यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर लगेच पंजाब काँग्रेसचे महासचिव योगिंदर धिंगरा आणि पंजाब काँग्रेसचे महासचिव (प्रभारी प्रशिक्षण) गौतम शेठ यांनीही पदाचा राजीनामा देऊ केलाय. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार नवज्योत सिंह सिद्धू यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाने राज्य नेतृत्वाला आपल्या स्तरावर प्रकरण हाताळण्याच्या सूचना केल्या आहेत. (5 leaders of Punjab Congress including Navjot Singh Sidhu resign)

रजिया सुल्ताना यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्याकडे पाठवला आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की, नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासोबत एकजूट दाखवत राजीनामा देत आहे. सुल्ताना या सिद्धू यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. त्यांचे पती मोहम्मद मुस्तफा हे सिद्धू यांचे मुख्य राजकीय सल्लागार आहेत. ते भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) अधिकारी राहिले आहेत. तत्पूर्वी सुल्ताना यांच्याकडे आज पाणीपुरवठा, स्वच्छता, सामाजिक सुरक्षा, महिला आणि बालविकास, मुद्रण व स्टेशनरी विभागाचा पदभार सोपवला होता. अमरिंदर सिंह यांच्या सरकारमध्ये सुल्ताना यांच्याकडे परिवहन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.

पक्षासाठी काम करत राहणार- रजिया सुल्ताना

सिद्धू साहेब हे सिद्धांतावर चालणारे व्यक्ती आहेत. ते पंजाब आणि पंजाबियतसाठी लढत आहेत, असं सुल्ताना यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हटलं. आपल्या राजीनाम्यात त्यांनी म्हटलं आहे की, पंजाबच्या हितासाठी एक कार्यकर्त्याच्या रुपात त्या पक्षासाठी काम करत राहील. आतापर्यंत त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीसाठी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, नवज्योत सिंह सिद्धू यांचा पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरुन हटल्यानंतर हा दुसरा राजीनामा आहे. सिद्धू यांच्या या राजीनाम्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला मोठ्या संकटात टाकलं आहे.

मुख्यमंत्रीपद हुकल्याने सिद्धू नाराज?

दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर आपल्याच पदरात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल असं सिद्धूंना वाटत होतं. मात्र, सिद्धूंकडे मुख्यमंत्रीपद आलं नाही. शिवाय नव्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री देण्यात आले. मात्र, सिद्धूंकडे उपमुख्यमंत्रीपदही दिलं गेलं नाही. त्यामुळे ते नाराज होते. त्याच नाराजीतून त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. तर काही सूत्रांच्या मते सिद्धू यांच्याकडे गृहमंत्रीपदाची धुरा जाऊ शकते, त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असावा, असं सांगितलं जात आहे.

इतर बातम्या :

नाराज कॅप्टन अमरिंदर सिंह भाजपच्या वाटेवर, दिल्लीत नड्डा, शहांना भेटण्याची शक्यता, पंजाब काँग्रेसला मोठा झटका लागणार?

कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानींचा अखेर काँग्रेसच्या हातात हात! राहुल गांधींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

5 leaders of Punjab Congress including Navjot Singh Sidhu resign