Success Story : भाकरीसाठी रेनकोट, फटाके विकले; आज घरात पाण्यासारखा पैसा, 153 कोटींचं साम्राज्य उभारणाऱ्या आइस्क्रीम मॅनची स्टोरी वाचाच!
Prabhakar Kamath Success Story : आई-वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर पार पडली. त्यामुळे स्वतःची स्वप्नं बाजूला ठेऊन व्यवसायात पाऊल ठेवलं, आज त्यांच्या कंपनीने तब्बल १६ कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे.

आई-वडिलांचं निधन झालं. त्यानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी व्यवसाय सुरु केला. एकेकाळी फटाके आणि रेनकोट विकणाऱ्या एस प्रभाकर कामथ यांनी मंगळुरुमध्ये एक आइस्क्रीम ब्रँड तयार केला ज्याची आता देशभर हजारो दुकानं पहायला मिळतात. १९७५ मध्ये त्यांनी एका छोट्याशा पार्लरपासून सुरुवात केली होती. आयडियल आईस्क्रिमच्या नावाने त्यांनी व्यवसाय सुरु केला. या कंपनीने २०२४-२०२५ या आर्थिक वर्षामध्ये १५३.२ कोटी रुपयांचा महसूलाचा मोठा टप्पा गाठला आहे.
एस. प्रभाकर यांना हवाई दलामध्ये सामिल व्हायचे होते. पण वयाच्या विसाव्या वर्षी त्यांच्या आई- वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची आणि भावडांची जबाबदारी त्यांच्या एकट्याच्या खांद्यावर पडली. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या स्वप्नांना मुठमाती देत उदरनिर्वाहासाठी व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले.
सुरुवातीला त्यांनी शिलाईचे साहित्य आणि रेनकोट विकायचे काम केले. त्यानंतर हंगांमानुसार व्यवसाय केले, ज्यामध्ये फटाक्यांचे दुकान लावले. पण त्यांना आता एका अशा व्यवसायाची आवश्यकता होतीय ज्याची मागणी ग्राहकांकडून वर्षभर केली जाईल. याच शोधात ते असताना त्यांना रसवंती केंद्र चालवण्याचाही विचार केला. पण हा व्यवसाय काही यशस्वी झाला नाही. मग त्यांना आइस्क्रीमच्या व्यवसायाची कल्पना सुचली, या व्यवसायाने मात्र त्यांचे सर्व जीनव बदलून टाकले.
सुरुवातीला त्यांनी तयार आइस्क्रीम विकण्याचा विचार केला. त्यासाठी त्यांनी मोठे फ्रीझर्स विकत घेतले. पण त्यांना आइस्क्रीमचा तुटवडा होऊ लागला. त्यामुळे त्यांनी स्वतःच आईस्क्रीम बनवण्याचाही निर्णय घेतला. त्यांनी घरी बनवलेले आइस्क्रीम चव चाखण्यासाठी शेजाऱ्यांनाही दिलेय. त्यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. सगळ्यांना चव आवडली. काहीच दिवसांमध्ये त्यांच्या आईस्क्रिमला मोठी मागणी वाढली.
प्रभाकर कामत यांनी कर्नाटकमधील मंगळुरु मार्केटमध्ये आयडियल आईस्क्रीमचे त्यांचे पहिले पार्लर १ मे १९७५ रोजी उघडले. त्यांनी १४ फ्लेवर्स उपलब्ध केले होते.चव गुणवत्ता आणि परवणारे दर यामुळे त्यांच्या ब्रँडने प्रचंड लोकप्रियता मिळवली. काहीच दिवसांमध्ये त्यांच्या पार्लरच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या.
कालांतराने पब्बास नावाच्या प्रसिद्ध आईस्क्रीम पार्लरसोबत हा ब्रँड जोडला गेला. त्यानंतर कालांतराने प्रभाकर कामथ यांच्या पुढच्या पिढीने (मुकुंद कामथ) या व्यवसायाला अधिक उंचीवर नेले. ब्रँडने पुढे अनेक इतर शहरांमध्ये विस्तार झाला. आता सध्या कंपनीचे नेटवर्क हे कर्नाटक, केरळ, गोवा याठिकाणी ८५०० हून अधिक दुकानांपर्यंत पोहोचले आहे. प्रॅकेज्ड आइस्क्रीम, कँडीज, कोन्स, संडेज आणि फळांचे फ्लेवर अशा एकूण १५०हून अधिक पदार्थांचा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश आहे.
दरम्यान, एवढच नाही तर ट्रॅक्सनच्या आकडेवारीनुसार कंपनीने २०२४-२०२५ या वर्षामध्ये १६.७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.