राष्ट्रपती भवनातील परमवीर गॅलरीचे उद्घाटन, भारतीय शूर वीरांच्या छायाचित्रांनी घेतली ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या फोटोंची जागा

Param Vir Dirgha : राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परमवीर दीर्घा या परमवीर गॅलरीचे उद्घाटन केले. या कॉरिडॉरमध्ये पूर्वी ब्रिटीश अधिकाऱ्यांचे फोटो होते, मात्र आता त्याजागी भारताच्या शूर वीराचे फोटो लावण्यात आले आहेत.

राष्ट्रपती भवनातील परमवीर गॅलरीचे उद्घाटन, भारतीय शूर वीरांच्या छायाचित्रांनी घेतली ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या फोटोंची जागा
Param Vir Dirgha
Image Credit source: X
| Updated on: Dec 17, 2025 | 4:32 PM

संपूर्ण देशात काल विजय दिन साजरा करण्यात आला, यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजधानीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परमवीर दीर्घा या परमवीर गॅलरीचे उद्घाटन केले. या कॉरिडॉरमध्ये पूर्वी ब्रिटीश अधिकाऱ्यांचे फोटो होते, मात्र आता त्याजागी भारताच्या शूर वीराचे फोटो लावण्यात आले आहेत. यामुळे आता या वीरांच्या शौर्याबद्दल लोकांना माहिती मिळण्यास मदत होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

परमवीर दीर्घा गॅलरीची उभारणी

परमवीर दीर्घा नावाच्या या गॅलरीमध्ये 21 परमवीर चक्र विजेत्या वीरांचे फोटो लावण्यात आले आहेत. भारत मातेचे रक्षण करण्यासाठी अदम्य दृढनिश्चय आणि अदम्य भावनेचे प्रदर्शन करणाऱ्या आपल्या राष्ट्रीय वीरांबद्दल पाहुण्यांना माहिती देण्यासाठी या गॅलरीची उभारणी करण्यात आली आहे. मातृभूमीच्या सेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर पुरुषांच्या स्मृतींना सन्मानित करण्यासाठी हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.

राष्ट्रपती भवनातील ज्या कॉरिडॉरमध्ये परमवीर गॅलरी उभारण्यात आली आहे, जिथे पूर्वी ब्रिटीश एडीसी (एड-डी-कॅम्प्स) चे फोटो होते. मात्र आता या फोटोंची जागा भारतीय शूर वीरांनी घेतली आहे. भारत मातेसाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे फोटो या गॅलरीत प्रदर्शित करण्याचा हा उपक्रम वसाहतवादी मानसिकता दूर करण्यासाठी आणि भारताच्या संस्कृती, वारसा आणि परंपरांच्या समृद्धतेचा स्वीकार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

परमवीर चक्र काय आहे?

भारत सरकारतर्फे दिला जाणारा परमवीर चक्र हा देशाचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. हा सन्मान युद्धादरम्यान शौर्य, धैर्य आणि आत्मत्यागाच्या अपवादात्मक प्रदर्शनासाठी शूर सुपुत्रांना दिला जातो. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या छायाचित्रांऐवजी, या कॉरिडॉरमध्ये आता राष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या शूर सैनिकांचे फोटो लावण्यात आले आहेत. या फोटोंखाली त्यांची माहितीदेखील उपलब्ध असणार आहे.

विजय दिन

1971 च्या युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवल्याच्या स्मरणार्थ 16 डिसेंबर हा विजय दिन साजरा केला जातो. या दिवशी पाकिस्तानी सैन्याने 93000 सैनिकांसह भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले होते. या युद्धातून बाग्लादेशची निर्मिती झाली होती. त्यामुळे या दिवशी विजय दिन साजरा केला जातो.