
भारतात टीबी (क्षयरोगाचे) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. अहवालानुसार, जगातील 27 टक्के टीबी रुग्ण हे भारतात आहेत. अनेकदा वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णांना जीवाला मुकावं लागतं. यासाठी केंद्र सरकाराच्या माध्यमातून 100 दिवसांचं टीबी मुक्त अभियान राबवण्यात आलं होतं. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली टीबी रुग्ण आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी देशभरात 100 दिवसांची देशव्यापी मोहीम राबवली गेली. 347 सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यात ही मोहीम जोमाने राबवण्यात आली. यामध्ये 12.97 कोटी व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 7.19 लाख क्षयरोगाचे रुग्ण आढळले. त्यापैकी 2.85 लाख लक्षणे नसलेले क्षयरोगाचे रुग्ण होते. रुग्णांचं लवकर निदान आणि तातडीचे उपचार मिळावे या मोहिमेचा हेतू आहे. 100 दिवसांच्या मोहिमेचा आढावा घेतल्यानंतर यात मोठं यश मिळाल्याचं दिसत आहे. या मोहीमेच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत टीबी मुक्त अभियानाचा आढावा घेण्यात आल्या. या बैठकीला केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नियमित उपचारांनी क्षयरोग आता बरा होऊ शकतो, त्यामुळे जनतेमध्येअसलेली भीती कमी करण्याची आणि जागरूकता वाढवण्याची गरज आहे. प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळावेत यासाठी वैयक्तिकरित्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. शहरी किंवा ग्रामीण भागातील आणि त्यांच्या व्यवसायांवर आधारित क्षयरोग रुग्णांच्या ट्रेंडचे विश्लेषण करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. बांधकाम, खाणकाम, कापड गिरण्या आणि तत्सम क्षेत्रातील कामगारांना, ज्यांना लवकर चाचणी आणि उपचारांची आवश्यकता आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं. तसेच यावेळी क्षयरोग निर्मूलनासाठी स्वच्छतेचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक नवीन उपक्रमांची माहिती देण्यात आली. पंतप्रधानांनी क्षयरोग चाचणी नेटवर्कच्या विस्ताराचे कौतुक केले.
Chaired a meeting on India’s mission to eliminate TB. Driven by active public participation, the movement has gained significant momentum over the last few years. Our Government remains committed to working closely with all stakeholders to realise the vision of a TB-free India. pic.twitter.com/axi2cJJOhV
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2025
टीबी मुक्त आढावा बैठकीत, जागतिक आरोग्य संघटनेचा 2024 टीबी रिपोर्टची आकडेवारी मांडण्यात आली. यात 2015 पासून 2023 दरम्यान टीबी रुग्णांची संख्या 18 टक्क्यांनी घटल्याचं सांगितलं. तसेच मृत्यू दरही 21 टक्क्यांनी कमी झाला आहे. हा वेग जागतिक सरासरीच्या दुप्पट आहे आणि 85 टक्के उपचार कव्हरेज दर्शवतो. दरम्यान, टीबी मुक्तीसाठी 9 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान टीबी मुक्त अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. या अभियानांतर्गत रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळत असून भारताचं टीबी मुक्तीचं अभियान लवकरच यशस्वी होईल असं दिसत आहे.