पूजा खेडकरवरुन प्रियंका गांधी यांनी सरकारला घेरलं, म्हणाल्या स्वप्न आणि विश्वासावर हल्ला

काँग्रेसच्या सरचिटनीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या म्हणाल्या की, या परीक्षेत आणखी पारदर्शकता आणली पाहिजे. पूजा खेडकर सारखे प्रकरण हे लाखो तरुणांचा विश्वास आणि स्वप्नांवर हल्ला आहे.

पूजा खेडकरवरुन प्रियंका गांधी यांनी सरकारला घेरलं, म्हणाल्या स्वप्न आणि विश्वासावर हल्ला
| Updated on: Jul 20, 2024 | 5:52 PM

देशात सध्या UPSC प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या मुद्दा गाजत आहे. त्यांच्याविरोधात दिल्ली क्राइम ब्रँचमध्ये FIR देखील दाखल केली आहे. बनावट कागदपत्र, फसवणूक, आयटी कायदा आणि अपंगत्व कायद्याच्या कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या UPSC नागरी सेवा परीक्षेत हेराफेरी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पूजा खेडकर यांच्यामुळे यूपीएससीची प्रमाणपत्र प्रणाली आणि त्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनीही यूपीएससीच्या प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारला घेरले आहे.

सरकारकडे मागितले उत्तर

प्रियंका गांधी यांनी या प्रकरणावरुन सरकारकडे उत्तर मागितले आहे. हे प्रकरण म्हणजे लाखो तरुणांच्या स्वप्नांवर आणि विश्वासावर हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रियंका गांधी वाड्रा यांनी शनिवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. प्रक्रियेतील अनियमिततेसाठी राजकीयदृष्ट्या UPSC मध्ये उच्च पदांवर नियुक्त झालेले लोक जबाबदार आहेत का? केवळ वरवर तपास करण्यापासून दूर राहणे योग्य आहे का? प्रमाणपत्रे तपासण्यासाठी ठोस संस्थात्मक यंत्रणा विकसित होऊ शकत नाही का?

कोट्यवधी लोकांचा विश्वास

यूपीएससीवरील हे प्रश्न देशातील कोट्यवधी लोकांशी निगडीत आहेत. UPSC प्रणाली अधिक पारदर्शक करण्याची नितांत गरज आहे. जनतेला आणि यूपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणांना या प्रश्नांची उत्तरे मिळणे महत्त्वाचे आहे. त्या म्हणाल्या की, ‘यूपीएससी ही देशातील सर्वात प्रसिद्ध परीक्षा आहे आणि त्यातून बाहेर पडणारे लोक हे शासन व्यवस्थेचे सर्वात महत्त्वाचे स्तंभ आहेत. देशातील कोट्यवधी लोकांचा विश्वास आणि आपल्या दैनंदिन कारभार या संस्थेच्या व्यावसायिक व्यवस्थेशी जोडलेला आहे. डोळ्यात खूप स्वप्ने आणि अंत:करणात समर्पण ठेवून तरुण या परीक्षेची किती मेहनत घेतात हे मी स्वतः पाहिले आहे.

पूजा खेडकरवर कारवाई

पूजा खेडकर यांचं प्रकरण समोर आल्यानंतर यूपीएससीने एक निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांनी, तपासानंतर आम्ही पूजा खेडकरविरोधात एफआयआर दाखल केल्याचं म्हटलं आहे. आम्ही एक घटनात्मक संस्था आहोत आणि नियमांचे पालन करणे किंवा त्यांची अंमलबजावणी करणे ही आमची जबाबदारी आहे. परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये आणि काही अनियमितता आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे आम्ही स्पष्ट केले आहे. उमेदवारांचा आमच्यावर विश्वास आहे. हा विश्वास अबाधित राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

पूजा खेडकर यांच्यावर बनावट अपंगत्व प्रमाणपत्र सादर करणे, वयाच्या मर्यादेत फेरफार करणे, सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत मर्यादेपेक्षा जास्त वेळा उपस्थित राहण्यासाठी ओळख बदलणे असे आरोप केले आहेत. यूपीएससीने तुमची उमेदवारी का रद्द केली जाऊ नये आणि तुम्हाला आगामी यूपीएससी परीक्षांमध्ये बसण्यापासून का रोखले जाऊ नये, याची उत्तरे मागणारी नोटीस ही जारी केली आहे.