दिल्लीतील स्फोटानंतर संपूर्ण देशात खळबळ, पुणे-मुंबईतही हायअलर्ट जारी

High Alert in Pune and Mumbai: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका पार्क केलेल्या कारमध्ये स्फोट झाला. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर मुंबई पुण्यासह देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिल्लीतील स्फोटानंतर संपूर्ण देशात खळबळ, पुणे-मुंबईतही हायअलर्ट जारी
Mumbai Pune High Alert after delhi Blast
| Updated on: Nov 10, 2025 | 8:12 PM

राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका पार्क केलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, कारने लगेच पेट घेतला तसेच शेजारील दोन ते तीन इतर वाहनांनाही आग लागली. या आगीत तीन ते चार वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या घटनेनंतर दिल्लीसह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. त्यामुळे देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिल्लीत भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू

लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की आसपास 200 ते 300 मीटर अंतरावर स्फोटाचा आवाज ऐकू गेला. या स्फोटात एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. काही गाड्यांचे फक्त सांगाडे उरले आहेत. त्यामुळे संपूर्ण दिल्लीत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे-मुंबईत हायअलर्ट जारी

दिल्लीतील या घटनेनंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. देशात इतर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. दिल्लीतील स्फोटानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

स्फोटाचे कारण शोधले जाणार, तपासाला सुरुवात

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी 6.45 वाजता स्फोट झाला आहे. दिल्लीतील ही घटना समोर आल्यानंतर लगेचच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. कारमधील स्फोटानंतर आग लागली. हीच आग विझविण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून केला जात आहे. दुसरीकडे बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. कारमध्ये स्फोट नेमका का झाला? यामागे काही घातपाताचा उद्देश तर नव्हता ना? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता शोधली जाणार आहेत.