Punjab DIG : 7 कोटी कॅश, 1.5 किलो सोनं, आलिशान गाड्या.. 2 लाख बेसिक पगार असलेल्या DIG च्या घरी कुबेराचा खजिना !

पंजाब पोलिसांचे डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांना लाच मागितल्याच्या आरोपाखाली सीबीआयने अटक केली. मोहाली आणि चंदीगडमधील त्यांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले आणि त्यात कोट्यावधींची रोकड, सोन्याचे दागिने, आलिशान गाड्या आणि बराच माल जप्त करण्यात आला.

Punjab DIG : 7 कोटी कॅश, 1.5 किलो सोनं, आलिशान गाड्या.. 2 लाख बेसिक पगार असलेल्या DIG च्या घरी  कुबेराचा खजिना !
डीआयजीच्या घरात कुबेराचा खजिना
| Updated on: Oct 17, 2025 | 12:53 PM

पंजाब पोलिसांच्या रोपार रेंजचे डीआयजी हरचरण सिंग भुल्लर हे बरेच चर्चेत असून त्यांना सीबीआयने गुरुवारी अटक केली. आज डीआयजी हरचरण सिंग आणि त्यांच्याशी संबंधित मध्यस्थांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून तिथे सीबीआय त्यांची रिमांड मागणार आहे. DIG भुल्लर यांनी मध्यस्थांमार्फत फतेहगड साहिबमधील मंडी गोविंदगड येथील एका भंगार विक्रेत्याकडून तब्बल 8 लाख रुपयांची लाच मागितली होती. तसेच ते पैसे दिले नाहीत तर खोट्या प्रकरणात अडकवेन अशी धमकी भंगार विक्रेत्याला दिली, असा आरोप डीआयजींवर आहे. त्यांचे मोहाली येथील ऑफील आणि चंदीगड येथील घरावर मारण्यात आलेल्या छाप्यात कोट्यावधींची कॅश आणइ बरंच सामान जप्त करण्यात आलं.

रोख रक्कम मोजण्यासाठी मागवलं मशीन

दिल्ली आणि चंदीगड येथील सीबीआय पथकाच्या 52 सदस्यांनी भुल्लर यांच्या मोहाली कार्यालयावर आणि चंदीगडमधील सेक्टर 40 येथील निवासस्थानी छापा टाकला. त्यावेळी डीआयी भुल्लर यांच्या घरातून 7 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली, जी तीन बॅगांमध्ये आणि दोन ब्रीफकेसमध्ये साठवून ठेवण्यात आली होती. त्या नोटा मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना नोटा मोजणारी तीन मशीन्स मागवावी लागली. एवढंच नव्हे तर दीड किलो सोन्याचे दागिने, महागडी घड्याळ, विदेशई दारू आणि एक रिव्हॉल्वरही जप्त करण्यात आली.

2009 सालचे IPS अधिकारी आहेत भुल्लर

यावेळी सीबीआयला डीआयजींच्या 15 मालमत्ता आणि आलिशान वाहनांशी संबंधित कागदपत्रे देखील सापडली. त्यांच्या निवासस्थानातून बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज सारख्या महागड्या गाड्या, त्यांच्या बँक लॉकरच्या चाव्या देखील जप्त करण्यात आल्या. हरचरण भुल्लर हे 2009 सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे वडील महाल सिंग भुल्लर हे पंजाबचे माजी डीजीपी होते. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भंगार विक्रेत्याने ज्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची नावे सांगितली, त्यांच्यावरही बारीक लक्ष ठेवले जात आहे. त्या स्क्रॅप डीलरने सांगितलं की, डीआयजीने मागितलेली लाच, त्याची मागणी पूर्ण करण्यात अनेक अधिकाऱ्यांचा सहभाग होता. या प्रकरणात इतर अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का याचाही सीबीआय तपास करत आहे.

भुल्लर यांना दरमहा 2 लाख 16 हजार 600 रुपये इतका बेसिक पगार मिळतो, तसेच त्यासह काही भत्ते असतात. मात्र त्यांनी 15 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे, ज्यामध्ये जालंधरमधील फार्महाऊस आणि चंदीगड आणि कपूरथला येथील जमिनीचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआयजी भुल्लर यांनी, त्यांना मिळालेल्या लाचेची नोंद करणारी एक डायरी ठेवली होती. या डायरीत कोणाकडून किती पैसे मिळाले, आणि त्याचा संपूर्ण हिशेब कसा देण्यात आला याची अगदी सविस्तर माहिती होती. सीबीआय सध्या त्यांच्या मोहाली कार्यालय आणि चंदीगड येथील घराची झडती घेऊन ती डायरी शोधत आहेत.