पंजाब लोक काँग्रेस भाजपात विलीन होण्याची शक्यता; अमित शाह, कॅप्टन अमरिंदर सिंग भेट आज

| Updated on: Sep 10, 2022 | 12:58 PM

अमरिंदर सिंग यांनी दोनदा पंजाबचे मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. 2002-2007 आणि 2017-2021 अशी नऊ वर्षे त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. अंतर्गत मतभेदांमुळे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.

पंजाब लोक काँग्रेस भाजपात विलीन होण्याची शक्यता; अमित शाह, कॅप्टन अमरिंदर सिंग भेट आज
अमित शाह आणि अमरिंदर सिंग
Image Credit source: ANI
Follow us on

नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. नवी दिल्लीत ही भेट अपेक्षित आहे. अमरिंदर यांनी अलिकडेच काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत नवा पक्ष स्थापन केला होता. पंजाब लोक काँग्रेस (PLC) असे या पक्षाचे नाव आहे. मात्र हा पक्ष भाजपामध्ये विलीन होण्याची आता चर्चा सुरू झाली आहे. या विलीनीकरणावर दोन्ही नेत्यांच्या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच भविष्यात संभाव्य जागावाटपावरही चर्चा होऊ शकते. नवी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांनी दोनदा पंजाबचे मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. 2002-2007 आणि 2017-2021 अशी नऊ वर्षे त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. अंतर्गत मतभेदांमुळे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.

नवा पक्ष आणि भाजपाशी युती

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वतःचा पंजाब लोक काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. एसएडी (युनायटेड) सहयोगी असलेल्या भाजपाशी त्यांनी युती केली होती. या युतीने पंजाबच्या निवडणुकीत सुमार कामगिरी केली. परिणामी आम आदमी पार्टीची सत्ता पंजाबमध्ये आली.

काय होता वाद?

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांच्या समर्थकांनी तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंड केले होते. पक्षाचा अजेंडा पूर्ण होत नसल्याचे आरोप-प्रत्यारोप एकमेकांवर केले जात होते. पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रमुखपदी सिद्धू यांची नियुक्ती करू नये, असे तत्कालिन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे मत होते. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या तीव्र विरोधानंतरही काँग्रेस हायकमांडने सिद्धू यांची निवड केली. त्यामुळे नाराज होऊन, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि नंतर काँग्रेस सोडली.

हे सुद्धा वाचा

युतीला अपयश

काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर सिंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. नंतर पंजाब लोक काँग्रेस (PLC) हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. भाजपा आणि SADसोबत युती केली. निवडणूक लढवली. पीएलसीने त्यांच्या जागा वाटपाच्या सुत्रानुसार 37 जागा, अकाली दल (युनायटेड) 15 जागा आणि भाजपाने 65 जागा लढवल्या. मात्र या युतीला अपयश आले आणि आम आदमी पार्टीने राज्यात एकहाती सत्ता स्थापन केली. भगवंत मान हे मुख्यमंत्री झाले.