इंजिनीअरसोबत असं घडायला नको होतं; लग्न आठवड्यावर असताना अचानक गेली नोकरी, कर्मचाऱ्याची पोस्ट व्हायरल

लग्न तोंडावर आलेले असताना एका कंपनीने कर्मचाऱ्याला अचानक नोकरीवरून काढून टाकले. यासंबंधीत पोस्ट शेअर करत कर्मचाऱ्याने आपले मत मांडले आहे. अशी अचानक नोकरी गेल्याने त्याच्या पायाखालची जमिन सरकली आहे.

इंजिनीअरसोबत असं घडायला नको होतं; लग्न आठवड्यावर असताना अचानक गेली नोकरी, कर्मचाऱ्याची पोस्ट व्हायरल
viral post
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 12, 2026 | 6:36 PM

लग्न म्हटलं की घरात आनंदाचं वातावरण, खरेदीची धावपळ, पाहूण्यांची रेलचेल आणि आयुष्याच्या नव्या सुरूवातीची स्वप्न…पण याच काळात तुमची नोकरी गेली तर? एका टेक कर्मचाऱ्यासोबत असंच काहीसं घडलं आहे. लग्नाच्या तयारीत व्यस्त असताना त्याला कंपनीतील नोकरीकपातीची चिंता सतावत होती. अखेर त्याने स्वत: मॅनेजरला फोन करून विचारलं आणि त्याला नोकरी जाणार असल्याची माहिती मिळाली. यात आणखी व्याप म्हणून कंपनी त्याला ही बातमी लग्नाच्या आठवड्यातच देण्याच्या तयारीत होती.

हा कर्मचारी अमेरिकेतली प्रसिद्ध चिपनिर्मीती कंपनी व्कलकॉममध्ये काम करत होता. त्याने रेडिटवरील Qualcomm या ग्रुपमध्ये हा आपल्याला आलेला अनुभव शेअर केला आहे. त्याच्या म्हणण्यांनुसार या महिन्याच्या अखेरीस त्यांचे लग्न होणार आहे. लग्नाची तयारी आणि त्यासोबतचा ताण यामुळे आधीच घाईगडबड होती. अशातच कंपनीने नोकरकपात सुरू झाल्याने आपली नोकरी जाणारी की सुरक्षित राहणार? हा प्रश्न त्याला सतावत होता.

Loading...

कर्मचाऱ्याने सांगितले की त्याने मॅनेजरला टीम्सवर संदेश पाठवला आणि फोन करण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्याला उत्तर मिळालं नाही. अखेर त्याने पुन्हा फोन करून थेट विचारलं की, या नोकरकपातीचा परिणाम आपल्यावर झाला आहे का? आपली नोकरी सुरक्षित आहे का? तेव्हा मॅनेजरने त्याला नोकरी जाणारं असल्याचं सांगितलं आणि त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. कर्मचाऱ्याच्या दाव्यानुसार, कंपनी पुढील आठवड्यात म्हणजेच त्याच्या लग्नाच्या आठवड्यात ही माहिती देणार होती. पण त्याने न राहावल्याने आधीच विचारून खात्री केली.

नोकरी जाण्याची बातमी मिळाल्यानंतर या कर्मचाऱ्याने सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला. कारण लग्न तोंडावर होतं. तोही एक आयुष्यातील महत्त्वाचा प्रसंग होता. त्यामुळे गेली तर गेली लग्नाचा आनंदही उडाला असता. त्याची पोस्ट वाचल्यानंतर अनेक रेडिट यूजर्सनी त्याला धीर दिला.लग्नाचा आनंद घे, जोडीदाराला ही घटना सांग, तिला प्रेमाने समजाव असा सल्लाही दिला.

व्कालकॉममध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात

दरम्यान व्कालकॉममध्ये जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरू असल्याची चर्चा आहे. कंपनीच्या जगभरातील सुमारे 52 हजार कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 7 टक्के कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणजेच सुमारे 3,600 पदं कमी केली जाऊ शकतात. भारतातही जवळपास 1,000 नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र या कर्मचाऱ्याची कहाणी रेडिटवरील पोस्टवर आधारित आहे. त्याची ओळख सार्वजनिक करण्यात आलेली नाही आणि कंपनीने या विशिष्ट कर्मचाऱ्याच्या प्रकरणावर स्वतंत्र अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us