फॅक्ट चेक : रेल्वेत खरंच वेटिंग तिकीटची सिस्टिम बंद होणार?
रेल्वे 2024 सालापासून वेटिंग तिकीट सिस्टिम (Waiting List System) बंद करेल, अशी माहिती सर्वत्र पसरल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून (Ministry of Railways) भविष्यातील योजनांबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याच निर्णयांपैकी एक निर्णय म्हणजे प्रवाशांच्या मागणीच्या आधारावर रेल्वे गाड्यांची संख्या वाढवणे. याबाबत माहिती समोर आल्यानंतर रेल्वेत वेटिंग तिकीट सिस्टिम बंद होईल, अशी चर्चा सुरु झाली. रेल्वे 2024 सालापासून वेटिंग तिकीट सिस्टिम (Waiting List System) बंद करेल, अशी माहिती सर्वत्र पसरल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
“प्रवाशांच्या मागणीनुसार पुरेशा सीट उपलब्ध करुन देण्यासाठी रेल्वेची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न रेल्वेकडून सुरु आहेत. त्यामुळे आगामी काळात वेटिंग तिकीटचं प्रमाण (Waiting List System) कमी होईल. मात्र, याचा अर्थ असा होत नाही की, रेल्वे तिकीट वेटिंगची पद्धत पूर्णत: बंदच होईल”, असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ विनोद कुमार यांनी शुक्रवारी (18 डिसेंबर) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेनंतर रेल्वेत वेटिंग तिकीट सिस्टिम बंद होणार असल्याची चर्चा सुरु झाली. खरंतर त्यांनी पत्रकार परिषदेत नॅशनल रेलवे प्लॅन आणि व्हिजन 2024 ची घोषणा केली. मात्र, या पत्रकार परिषदेनंतर 2024 सालापासून रेल्वेची वेटिंग तिकीट सिस्टिम बंद होईल, अशी माहिती पसरली. तसं झाल्यास हजारो प्रवाशांना रेल्वे प्रवासापासून वंचित राहावं लागेल. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने तातडीने प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबत स्पष्टीकरण दिलं.
“रेल्वे तिकिट वेटिंग लिस्ट सिस्टिम बंद करण्याबाबत सरकारचं काहीच नियोजन नाही. प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वेची पूर्तता करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. यामुळे वेटिंग लिस्ट सिस्टिम कमी होईल. वेटिंग लिस्ट सिस्टम ही एक तरतूद आहे जी कोणत्याही ट्रेनमध्ये प्रवाशांना उपलब्ध असलेल्या सीट्सच्या संख्येपेक्षा जास्त आहे. प्रवाशांच्या संख्येत उतार-चढाव असल्यास वेटिंग लिस्ट सिस्टिममुळे प्रवांशाना फायदा होतो”, असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं.
प्रवाशांना वेटिंग लिस्ट सिस्टिमद्वारे रेल्वेने प्रवास करता येईल. प्रवाशांच्या मागणीनुसार वेटिंग तिकिटाची आवश्यकता भासू नये म्हणून रेल्वे गाड्या वाढवण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः सण, उन्हाळ्याच्या सुट्ट्या यांसारख्या गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या गरजांनुसार गाड्या वाढवल्या जाऊ शकतात, असं रेल्वे मंत्रालयाने सांगितलं आहे.
हेही वाचा : रेल्वेचा झिरो बेस्ड टाईमटेबल काय आहे? प्रवाशांवर काय परिणाम होणार ?
