सात आठवड्यांच्या आजारी राजाला वनतारात नेणार; आसाममधून विशेष विमानाने एअरलिफ्टची सोय

सात आठवड्यांच्या आजारी असलेल्या राजा या हत्तीच्या पिल्लाला गुजरातमध्ये हलवण्यात येणार आहे. आसाममधून खास विमानाने या राजाला जामनगरला एअरलिफ्ट करण्यात येत आहे.

सात आठवड्यांच्या आजारी राजाला वनतारात नेणार; आसाममधून विशेष विमानाने एअरलिफ्टची सोय
Seven week old elephant calf Raja
| Updated on: Nov 20, 2026 | 5:16 PM

एका सात आठवड्याच्या हत्तीचे पिल्लू राजा याला आसाम येथून गुजरात जामनगराच्या वनतारा ( Vantara ) एलिफंट हॉस्पिटलमध्ये एअर लिफ्ट करण्यात येणार आहे. या हत्तीच्या पिल्लाच्या मांडीचे हाड मोडल्याने त्याची तब्येत बिघडत चालल्याने त्याच्यावर वनतारामध्ये उपचार करण्यात येणार आहेत. गेल्या अनेक आठवड्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्याची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला विशेष वैद्यकीय उपचारांची गरज निर्माण झाल्याने त्याला वनतारा येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वनताराने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, राजाला गुवाहाटीहून जामनगरला विशेष विमानाने नेण्यात येणार आहे. हा प्रवास सुमारे चार तासांचा असेल. रस्तेमार्गाने त्याला 2,500 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार करावे लागले असते. पायाचे हाड फ्रॅक्चर झालेले असताना आणि प्रकृतीत अनेक गुंतागुंत निर्माण झालेली असताना एवढा लांबचा प्रवास त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकला असता.

Loading...

elephant raja

हत्तीच्या पिल्लाचा पाय कसा फ्रॅक्चर झाला?

राजा हत्तीचा जन्म 2 ऑक्टोबर 2026 रोजी आसाममधील गोगामुख येथे झाला होता. वनताराच्या माहितीनुसार, प्रसूतीनंतर काही वेळातच त्याची 11 वर्षांची आई घाबरली आणि तिने नवजात पिल्लाला लाथ मारली. त्यामुळे राजाच्या उजव्या मागच्या पायातील मांडीचे मोठे हाड (फेमर) पूर्णपणे फ्रॅक्चर झाले.

या दुखापतीमुळे राजाला उभे राहणे किंवा स्वतःच्या शरीराचे वजन पेलणेही शक्य नव्हते. त्यातच नवजात पिल्लांना रोगप्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठी आवश्यक असणारे आईचे पहिले दूध म्हणजेच कोलोस्ट्रमही त्याला मिळू शकले नाही.

सात आठवड्यांपासून उपचार, मात्र राजाची प्रकृती गंभीर

राजाच्या देखभाल करणाऱ्यांनी मदतीची विनंती केल्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी वनताराची पशुवैद्यकीय टीम त्याच्यापर्यंत पोहोचली. डॉक्टरांनी एक्स-रेच्या माध्यमातून फ्रॅक्चरची खात्री केली. त्यानंतर प्लास्टर आणि पट्ट्यांच्या साहाय्याने त्याच्या जखमी पायाला आधार देऊन स्थिर करण्यात आले.

10 ऑक्टोबर रोजी राजाला त्याच्या मालकाच्या पोहुमारा येथील निवासस्थानी हलवण्यात आले. तिथेही उपचार सुरू ठेवण्यात आले. जखमी पायावर वजन न पडता त्याला हालचाल करता यावी, यासाठी एक छोटा हायड्रोथेरपी तलावही तयार करण्यात आला.

मात्र, पुढे त्याच्या प्रकृतीत अनेक गुंतागुंत निर्माण झाल्या. त्याला अतिसार, जिवाणू संसर्ग, वारंवार रक्तातील साखरेची पातळी कमी होणे, यकृताशी संबंधित समस्या आणि बराच वेळ एकाच स्थितीत पडून राहिल्यामुळे शरीरावर जखमा झाल्या. याशिवाय नाभीच्या ठिकाणी हर्निया आणि सर्वसाधारण अशक्तपणाही आढळून आला.

राजाला गुजरातला नेण्यासाठी विशेष विमान

वनताराने दिलेल्या माहितीनुसार, वनतारा संस्थेचे संस्थापक अनंत अंबानी यांच्या सहकार्याने राजाला विमानाने हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनंत अंबानी यांच्या मदतीने हत्तींना एअरलिफ्ट करण्याची ही तिसरी मोहीम असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

राजाला विशेष पद्धतीने तयार केलेल्या क्रेटमध्ये ठेवून विमानातून नेण्यात येणार आहे. या क्रेटमध्ये राजासाठी खास मऊ गादीची व्यवस्था असेल, तसेच फ्रॅक्चर झालेल्या पायाला योग्य आधार दिला जाईल. संपूर्ण प्रवासादरम्यान पशुवैद्यकीय डॉक्टर आणि त्याची देखभाल करणारे कर्मचारी त्याच्या प्रकृतीवर, तसेच शरीरातील महत्त्वाच्या वैद्यकीय हालचालींवर सतत लक्ष ठेवून असणार आहेत. वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवान करणी म्हणाले, “राजा या जगात तुटलेल्या पायासह आला, पण त्याची जिद्द मात्र कधीच तुटली नाही.”

जामनगरला राजावर कोणते उपचार होणार?

जामनगर येथील वनतारा रुग्णालयात पोहोचल्यानंतर राजाची पुन्हा डिटेल्स वैद्यकीय तपासणी करण्यात होईल. त्यानंतर हाडांवरील विशेष उपचार, पोषण आहार आणि पुनर्वसन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.राजाला झालेली दुखापत आणि त्याच्या प्रकृतीतील गुंतागुंत लक्षात घेता, त्याला आयुष्यभर पशुवैद्यकीय उपचार आणि नियमित देखरेखीची गरज भासू शकते, असे वनताराने स्पष्ट केले आहे.त्याच्या फ्रॅक्चर झालेल्या हाडाची जखम कितपत भरून येते आणि इतर आरोग्यविषयक समस्यांवरील उपचारांना तो कसा प्रतिसाद देतो, यावर त्याच्या पुढील प्रकृतीचे भवितव्य अवलंबून असेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us