राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी शेतकरी आंदोलनाला पुन्हा धार, गाझीपूरमध्ये पुन्हा आंदोलक एकवटले

| Updated on: Jan 29, 2021 | 11:12 AM

शेतकरी नेते राकेश टिकैत (Farmer Leader Rakesh Tikait ) यांच्या अश्रूंनी पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला (Farmers agitation) धार चढली आहे.

राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी शेतकरी आंदोलनाला पुन्हा धार, गाझीपूरमध्ये पुन्हा आंदोलक एकवटले
राकेश टिकैत
Follow us on

नवी दिल्ली : शेतकरी नेते राकेश टिकैत (Farmer Leader Rakesh Tikait ) यांच्या अश्रूंनी पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला (Farmers agitation) धार चढली आहे. सरकार पोलीस प्रशासनाच्या मदतीने शेतकरी आंदोलन दडपत आहे, असा गंभीर आरोप राकेश टिकैत यांनी केला होता. सरकार आणि पोलिसांच्या दबावामुळे संयमाचा बांध फुटलेल्या राकेश टिकैत यांना अश्रू अनावर झाले. हेच अश्रू खचलेल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा उमेद देणारे ठरले आहेत. गाझीपूरमध्ये शेतकरी पुन्हा एकवटण्यास सुरुवात झाली आहे. (Rakesh Tikaits tears turning point in farmers protest)

जे शेतकरी मुद्दे आहे त्यावर सरकारसोबत बातचीत होईल. शेतकऱ्यांचे मागण्यांवर समाधान झाल्यानंतर ही जागा सोडू. तोपर्यंत कुठलीही बॉर्डर खाली होणर नाही, असं राकेश टिकैत म्हणाले.

प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर शेतकरी आंदोलनात फाटाफूट झाली. पोलिसांनीही बळाचा वापर करुन शेतकऱ्यांना पांगवण्याचा पवित्रा घेतला. मात्र “जीव देईन, पण इथून हटणार नाही. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त होऊ देणार नाही. कृषी कायदे मागे घेतले नाही, तर मी आत्महत्या करेन,” अशी गर्जना केल्यानंतर, शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा त्याच त्वेषाने मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे.

दिल्ली-उत्तरप्रदेश सीमेवर गाझीयाबादचे जिल्हाधिकाऱ्यांनी रातोरात आंदोलनस्थळ रिकामे करण्याच आदेश दिले होते. या आंदोलनस्थळावर बुधवारपासूनच वीज आणि पाणी बंद केलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आंदोलनस्थळ रिकामं होण्याचे संकेत मिळत होते. मात्र टिकैत यांच्या अश्रूंनी आंदोलक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंगारी फुलवली.

पोलिसांना अपयश

दरम्यान, गाझीपूर बॉर्डरवरील आंदोलक शेतकऱ्यांना परतवून लावण्यास पोलिसांना अपयश आलं. रात्री पोलिसांनी आंदोलकांना परतण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आत्महत्या करेन पण मागे हटणार नाही अशी भूमिका घेतल्याने आंदोलन सुरुच राहिलं. राकेश टिकैत यांनी भावूक होत पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेनंतर उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे मोठे समर्थन टिकैत यांना मिळत आहे. आज मोठ्या संख्येने शेतकरी गाझीपूर बॉर्डरवर येण्याची शक्यता आहे.

आत्मसमर्पण करणार नाही

राकेश टिकैत यांनी आक्रमक पवित्रा घेत कोणत्याही परिस्थितीत आत्मसमर्पण कऱण्यास नकार दिला. कितीही गुन्हे दाखल होऊ द्या, विरोधाची धार आणखी तीव्र करु, पण मागे हटणार नाही, असं राकेश टिकैत म्हणाले. “देशातील शेतकऱ्यांसोबत अन्याय होतोय. लाल किल्ल्यावर मोदींसोबत फोटो काढणाऱ्याने झेंडा फडकावला. त्याच्यावर कारवाई व्हावी. पोलीस दडपशाही करत आहेत. गावांमधून आलेल्या शेतकऱ्यांनी घाबरु नये. नवे कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही. ज्या मागणीसाठी इथं आलो आहोत ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. शेतकरी आंदोलन सुरुच राहिल.”

कोण आहेत राकेश टिकैत

शेतकरी नेते असलेले महेंद्रसिंग टिकैत यांचे ते पुत्र आहेत. राकेश टिकेत यांचा जन्म मुजफ्फरनगरच्या सिसोली गावात झाला. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा नेता, आंदोलन करणारा नेता अशी त्यांची ओळख… ते सध्या भारतीय किसान युनियनची जबाबदारी सांभाळत आहेत. या संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता म्हणूनही ते काम पाहतात. या संघटनेचं प्रस्थ उत्तर प्रदेशसहित उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर आहे.

(Rakesh Tikaits tears turning point in farmers protest)

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी नोकरीवर लाथ ते जेलवारी, वाचा मोदी सरकारला जेरीस आणणारे राकेश टिकैत कोण आहेत?

‘कृषी कायदे परत घेतले नाही, तर आत्महत्या करेन,’ शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा इशारा

Farmer Protest : योगी सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना शेतकरी आंदोलन बंद करण्याचे आदेश, गाझियाबादमध्ये कलम 144 लागू