Ramdev Baba: रामदेव बाबा ट्रम्प यांच्यावर भडकले; म्हणाले, ‘हा तर थेट दहशतवाद’

Ramdev Baba: गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणलेले आहेत. अशातच आता योगगुरू रामदेव बाबा यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांवर आणि टॅरिफच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे.

Ramdev Baba: रामदेव बाबा ट्रम्प यांच्यावर भडकले; म्हणाले, हा तर थेट दहशतवाद
ramdev baba and trump
| Updated on: Nov 06, 2025 | 9:16 PM

गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणलेले आहेत. अशातच आता योगगुरू रामदेव बाबा यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. रामदेव बाबा यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांवर आणि टॅरिफच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे. अमेरिकेने लादलेल्या शुल्काला बाबा रामदेव यांनी या दहशतवाद असे म्हणत सध्या आर्थिक युद्धाची तुलना तिसऱ्या महायुद्धाशी केली आहे.

टॅरिफ म्हणजे दहशतवाद – बाबा रामदेव

अमेरिकेच्या आर्थिक धोरणांचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसत आहे. यावर बोलताना रामदेव बाबा यांनी आक्रमक विधान केले आहे. बाबा म्हणाले की, टॅरिफ म्हणजे दहशतवाद, ते खूप घातक आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर, जर तिसरे महायुद्ध झाले तर ते हेच आर्थिक युद्ध आहे. या जागतिक आर्थिक संघर्षात, गरीब आणि विकसनशील देशांचे हित किमान लक्षात घेतले पाहिजे.’

पुढे बोलताना रामदेव बाबा यांनी अमेरिकेच्या धोरणांना साम्राज्यवादी आणि विस्तारवादी असे म्हटले आहे. तसेच त्यांनी जिथे काही व्यक्ती जगाची सत्ता आणि समृद्धी नियंत्रित करतात अशी व्यवस्थी चुकीची आहे, अशा व्यवस्थेमुळे जगभरात असमानता, अन्याय, शोषण आणि संघर्षच निर्माण होतील असंही म्हटले आहे.

रामदेव बाबा पुढे बोलताना म्हणाले की, ‘प्रत्येकाने स्वतःच्या मर्यादेत राहून सर्वांसोबत पुढे जाण्यावर भर दिला. जर काही मूठभर लोक जगाची सत्ता, संपत्ती, समृद्धी आणि ताकद नियंत्रित करत असतील तर असमानता, अन्याय, शोषण, संघर्ष आणि रक्तपात जगभर पसरेल.’

यावरील उपायावर बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, या आर्थिक युद्धाचे उत्तर ‘स्वदेशी’ उत्पादनांचा वापर करणे हे आहे. स्वदेशी म्हणजे केवळ घरगुती उत्पादने खरेदी करणे हे नसून, सर्वांना एकत्रितपणे विकसित करणे हे आहे. स्वदेशी हे स्वावलंबन, स्वावलंबन आणि समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या उन्नतीचे तत्वज्ञान आहे.’

पुढे बोलताना रामदेव बाबा यांनी, महर्षी दयानंदांपासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत अनेक महान भारतीय व्यक्तींनी ‘स्वदेशी’ या कल्पनेचा पुरस्कार केला होता असं म्हटलं आहे. अमेरिकेची धोरणे जागतिक व्यापाराला धोका ठरत असताने रामदेव बाबांनी हे विधान केले आहे.

भारत-अमेरिकेत तणाव का आहे?

अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50 टक्के कर लादला आहे, यामुळे भारतीय उत्पादनांना अमेरिकन बाजारपेठेत स्पर्धा करणे कठीण झाले आहे. सध्या भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत चर्चा सुरु आहे. भारताने रशियन तेलाची खरेदी कमी करण्यास सहमती दर्शविली असल्याती माहिती समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे स्पष्ट केले आहे की, भारत हा तेलाचा एक प्रमुख आयातदार आहे आणि अशा अस्थिर जागतिक ऊर्जा परिस्थितीत भारतीय ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे ही सरकारची प्राथमिकता आहे.