
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पहिल्या ‘आयपीएल’ जेतेपदाच्या जल्लोषावेळी खेळाडूंच्या स्वागतासाठी जमलेल्या चाहत्यांच्या चेंगराचेंगरीत 11 जणांनी आपले प्राण गमावले. तर 47 जण जखमी झाले आहेत. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपने राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकारवर टीका केली. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप केला. योग्य नियोजनअभावनी हा प्रकार घडल्याची टीका केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केली. तर सुरक्षा देणं ही राज्य सरकारची जबाबदारी होती. इतर बाबी क्रिकेट संघटनेनं हाताळायला हव्या होत्या, असा दावा सिद्धरामय्या यांनी केला. ही घटना धक्कादायक असून आयोजकांनी या मोठ्या कार्यक्रमाचं चोख नियोजन करणं गरजेचं होतं, असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजित सैकिया म्हणाले.
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “दररोज राहुल गांधी हे सैन्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवतात. परंतु जेव्हा इतक्या लोकांनी एका दुर्घटनेत आपले प्राण गमावले, तेव्हा राहुल गांधी कुठे आहेत?” याप्रकरणी तात्काळ कारवाई करावी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना दिल्लीला बोलवून घ्यावं अशी मागणी भाजपने राहुल गांधींकडे केली.
भाजप प्रवक्त्यांनी असंही म्हटलंय की या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. त्याचसोबत डीके शिवकुमार यांनी जनतेची माफी मागावी. घटनेवरून प्रश्न उपस्थित करत भाजपने विचारलं, “तीन लाख लोक तिथे कसे पोहोचले? त्यांच्यासाठी परवानगी होती का? जर पोलिसांनी तिथे परवानगी दिली नव्हती, तर तिथे विक्ट्री मार्च कसा झाला? जेव्हा लोक चेंगराचेंगरीत मरत होते, तेव्हा तिथे जल्लोष साजरा केला जात होता. आजसुद्धा 50 जण रुग्णालयात जखमी आहेत. ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे.”
जर अभिनेता अल्लू अर्जुनला चेंगराचेंगरीच्या एका घटनेत अटक केली जाऊ शकते, तर मग डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यावर कारवाई का होऊ नये, असाही सवाल भाजपने केला आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी तिथे गर्दी जमली होती. काही महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती.
बुधवारी सकाळी आरसीबी संघ व्यवस्थापनाने खुल्या बसमधून विजयी मिरवणूक काढण्याचं जाहीर केलं होतं. विधानसौध ते चिन्नास्वामी स्टेडियम हे एक किलोमीटरचं अंतर आहे. कार्यक्रमापूर्वी ऑनलाइन स्वरुपात मर्यादित प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र दुपारी 11 वाजून 56 मिनिटांनी वाहतूक पोलिसांनी विजयी मिरवणूक नसल्याचं स्पष्ट केलं. दुपारी दीडच्या सुमारास आरसीबीची टीम बंगळुरू विमानतळावर दाखल झाली. तिथून बसने ते हॉटेलमध्ये दाखल झाले. खेळाडू विधानसौधकडे जाण्यापूर्वीच हजारो चाहते तिथे जमा झाले. त्यात जमावातील काही जण झाडावर चढले, तर काही कर्नाटक उच्च न्यायालयाच्या इमारतीवर गेले. पोलिसांच्या अंदाजानुसार दुपारी तीन वाजता तिथल्या एक किमी परिसरात पन्नास हजार जण होते. नंतर ही संख्या वाढतच गेली.
प्रवेशिका मर्यादित होत्या, तसंच विजयी मिरवणूक रद्द झाल्याचं अनेकांना माहीत नव्हतं. खेळाडू बंद वाहनातून स्टेडियमकडे जात असताना दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्टेडियमचं क्रमांक तीनचं प्रवेशद्वार काही काळ उघडण्यात आलं. त्यावेळी प्रवेशिका असलेले तसंच इतर क्रिकेटप्रेमींनी आत जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान चेंगराचेंगरी झाली.