पश्चिम रेल्वेवर उद्या 277 लोकल रद्द, 5 दिवसांचा मेगाब्लॉक, मेल-एक्सप्रेसवरही परिणाम
पश्चिम रेल्वेच्या कांदिवली- बोरीवली सेक्शनमध्ये सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यासाठी 27 डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वेवर एकूण 277 लोकल ट्रेन रद्द होणार आहेत. सकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत लोकल ट्रेनच्या सेवा प्रभावित होणार आहेत. अनेक एक्सप्रेस ट्रेनच्या वेळेत बदल होणार आहे.

मुंबई : कांदिवली – बोरीवली सेक्शनवरील सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेने ३० दिवसांचा ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक 20/21 डिसेंबर 2025 पासून सुरु झाला असून 18 जानेवारी 2026 पर्यंत चालणार आहे. याच ब्लॉकमध्ये 27 डिसेंबर ( शनिवारी ) सकाळी 4 ते रात्री 9 च्या दरम्यान तब्बल 277 लोकल ट्रेन रद्द होणार आहेत. याशिवाय 26 आणि 27 डिसेंबरच्या मध्यरात्री देखील अनेक लोकल ट्रेन अंशत: रद्द होतील. काही मेल-एक्सप्रेसच्या आगमन आणि निर्गमनच्या वेळेतही बदल होणार आहे. ज्यामुळे प्रवाशांच्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. बेस्ट पश्चिम उपनगरात अधिक फेऱ्या चालवण्याच्या निर्णय घेतला आहे.
ब्लॉकमुळे गतीवर नियंत्रण
बोरीवली स्थानकात अप आणि डाऊन स्लो मार्गावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) पॅनलच्या कमिशनिंग कार्यासाठी 26 आणि 27 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजता सकाळी 7 वाजेपर्यंत मेजर नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेतला जाणार आहे. यात सोबत 26 डिसेंबरच्या रात्री 11 वाजल्यापासून 28 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कांदिवली आणि दहिसरच्या दरम्यान डाऊन फास्ट मार्गिकेवर वेगावर नियंत्रण लागू होणार आहे. यामुळे काही लोकल ट्रेन रद्द रहातील, तर काही लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे.
मेल-एक्सप्रेसवर ही परिणाम
ब्लॉकच्या कालावधी दरम्यान 28 डिसेंबर 2025 पर्यंत नंदुरबार- बोरीवरी एक्सप्रेस आणि अहमदाबाद एक्सप्रेस बोरीवलीच्या ऐवजी वसईत शॉर्ट टर्मिनेट आणि ओरिजनेट होईल. बोरीवली-वलसाड मेमू ट्रेन डहाणूपासून सुरु होऊन तेथेच समाप्त होईल. तर 28 डिसेंबर रोजी बोरीवली -डहाणू मेमू रद्द राहील. या शिवाय 7 अप आणि 10 डाऊन ट्रेन री-शेड्युल असतील, 111 अप आणि 3 डाऊन ट्रेन रेग्युलेट केल्या जातील. तसेच 6 एक्सप्रेस ट्रेन बोरीवली स्थानकावर थांबणार नाहीत.
असा होणार लोकल आणि एक्सप्रेसवर परिणाम
| तारीख | अप लोकल | डाऊन लोकल | एकूण ट्रेन |
|---|---|---|---|
| 25 डिसेंबर | 47 | 47 | 94 |
| 26 डिसेंबर | 40 | 47 | 87 |
| 26-27 डिसेंबर रात्र | 22 | 18 | 40 |
| 27 डिसेंबर | 149 | 149 | 277 |
ब्लॉकमध्ये काय काम होणार
या ब्लॉकमध्ये कांदिवली आणि बोरीवली स्थानकावर ट्रॅक स्लीविंग, अनेक क्रॉसओवर्सचे इन्सर्शन आणि रिमूव्हल,सिग्नलिंग तसेच ओव्हरहेड इक्विपमेंट संबंधित महत्वाची काम केली जातील. या तांत्रिक कामामुळे उपनगरीय, पॅसेंजर आणि मेल-एक्सप्रेस ट्रेनचे संचालन प्रभावित होणार आहे.
बेस्टच्या जादा बसेस
पश्चिम रेल्वेने 26 आणि 30 डिसेंबर दरम्यान बेस्ट प्रशासनाला बोरीवली-चर्चगेट आणि बोरीवली-विरार मार्गावर अतिरिक्त बस चालवण्यास सांगितले आहे. बेस्टने गरजेनुसार जादा बेस्ट चालवण्यात येतील असे उत्तर दिले आहे.
