
दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा मान आता रेखा गुप्ता यांना मिळाला आहे. पन्नाशीला पोहचलेल्या रेखा गुप्ता या उद्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हा सोहळा रामलीला मैदान येथे दुपारी होणार आहे. त्या देशाच्या १८ व्या महिला मुख्यमंत्री बनणार आहेत. या आधी कोणाला हा मान मिळाला हे पाहणे महत्वाचे आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी आपल्या देशाला लाभल्या आहेत. भारताच्या सर्वोच्च पदावर निवडून आलेल्या पहिल्या राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील विराजमान झाल्या होत्या. आताही दौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान आहेत. मात्र, महाराष्ट्राला अजूनही महिला मुख्यमंत्री मिळालेला नाही. परंतू देशातील अनेक राज्यात महिलांच्या हाती राज्याची सूत्रे गेली असून त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली आहेत.
दिल्लीतच आप पार्टीच्या अतिशी यांना मु्ख्यमंत्री म्हणून सन्मान मिळाला होता. त्याआधी काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी तर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविले आहे. आपच्या अतिशी यांना सर्वात कमी काळ दिल्लीचे मुख्यमंत्री पद भूषवायला मिळाले त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या सुषमा स्वराज या १९९८ मध्ये ५२ दिवस राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. आता रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनणार असून त्या देशाच्या १८ व्या महिला मुख्यमंत्री ठरणार आहेत.
या आधी देशात तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून १३ वर्षे १२० दिवस ( २०११ पासून पदावर कायम ) काम करीत आहेत. तर राजस्थानच्या मुखमंत्री म्हणून भाजपाच्या वसुंधरा राजे ( २००३-०८,२०१३-१८, ) असे दहा वर्षे राहिल्या आहेत. बसपाच्या मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून ७ वर्षे ५ दिवस (१९९५,१९९७,२००२-०३,२००७-१२ ) राहिल्या आहेत. तर दक्षिणेतील राज्य तामिळनाडूच्या जय ललिता या १४ वर्षे १२४ दिवस( १९९१-९६,२००२-०६,२०११-१४,२०१५-१६ ) मुख्यमंत्री राहिल्या आहेत. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ शीला दीक्षित राहिल्या असून त्या १५ वर्षे (१९९८-२०१३ ) राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.