राजीव गांधींचा जवळचा मित्र, आज PM मोंदींसाठी राहुल गांधींच्या विरोधात गेला
Sam pitroda on rahul gandhi phone tapping claim : गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी मोदी फोन टॅप करत असल्याचा आरोप केला असताना पित्रोदा यांनी मात्र या दाव्याशी असहमती दर्शवली आहे. 'पंतप्रधान मोदी असं करत नाहीत', असं स्पष्टपणे सांगत त्यांनी राहुल गांधींच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका मांडली आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे फायरब्रँड राहुल गांधी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार आणि खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व निवडणूक आयोगाला टार्गेट केलेलं आहे. ते विविध माध्यमांतून अनेक टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून ते आपली भूमिका अगदी चोखपणे बजावत असल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत. पण आता राहुल गांधींना थेट त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्यानेच धक्का दिला आहे. होय, काँग्रेसचे अगदी जवळचे सहकारी आणि ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आणि एकेकाळी पंतप्रधान असताना राजीव गांधी यांचे सल्लागार म्हणून काम करणारे सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधींच्या एका मताशी असहमती दर्शवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला फोन टॅप करत असल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींनी केला होता. त्यांच्या या आरोपावर, “पंतप्रधान फोन टॅप करत नाहीत, ते स्क्रूड्रायव्हर घेऊन कॉम्प्युटरसमोर बसत नाहीत,” असं थेट वक्तव्य पित्रोदा यांनी केलं आहे. एवढंच नाही, तर काही दिवसांपूर्वीच पित्रोदा यांनी एका मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली होती. त्यांनी एक गुजराती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले मित्र आहेत, असं म्हटलं होतं. एवढंच नाही, तर त्यांनी पंतप्रधान मोदींना दीपावलीच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.
नेमकं काय म्हणाले सॅम पित्रोदा?
NDTVच्या मुलाखतीत बोलताना त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान फोन टॅप करत नाहीत. पंतप्रधान स्क्रूड्रायव्हर घेऊन कॉम्प्युटरसमोर बसत नाहीत. माझाही फोन टॅप केला जातो, यावर विश्वास ठेवण्यासाठी त्यांच्याकडे ठोस कारणंही आहेत. माझा लॅपटॉपही हॅक होतो. माझ्या बँक खात्यावरही पाळत ठेवली जाते. त्यासाठी मी तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे आणि त्यांनी माझ्या उपकरणांची तपासणी केल्यानंतर फोन टॅपिंगबद्दल मला सावध केलं आहे, असं पित्रोदा यांनी या मुलाखतीत म्हटलंय.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, कुणीतरी हे करतं, पण मला त्याची पर्वा नाहीये आणि मला माहिती नाही की हे कोण करतं?. पण मला याची सवय झाली आहे. मी याच्यासोबत जगतो आणि यात मला काही अडचण नाही. जगात अनेक वाईट लोक आहेत. तुम्ही काय करू शकता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राहुल गांधींचे आरोप काय आहेत?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं होतं की, “माझ्याकडे सर्व आरोपांचे पुरावे फोनमध्ये आहेत, जे केंद्र सरकार टॅप करत आहे.” या संदर्भात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना सार्वजनिक आणि one-to-one चर्चेचं खुलं आव्हानही दिलं आहे. जर आमच्यामध्ये चर्चा झाली, तर पंतप्रधानपदावरून मोदी पायउतार होतील, असा दावाही राहुल गांधी यांनी केलेला आहे.