‘दृश्यम’सारखा प्लॅन आखला, पण एका कॉलने सगळं उघड केलं; 2 हजार किमी दूरून येत वडिलांची हत्या
समस्तीपूरमध्ये 'दृश्यम' चित्रपटासारखा थरारक गुन्हा उघडकीस आला आहे. जमिनीच्या वादातून मुलाने वडिलांची कुऱ्हाडीने हत्या केली आणि पोलिसांना चकवा देण्यासाठी २ हजार किलोमीटर दूर सुरतला असल्याचे नाटक केले. मोबाईल बंद ठेवण्याचा डाव एका कॉलमुळे फसला आणि लोकेशन ट्रेस होऊन आरोपी पकडला गेला.

Samastipur News : ‘दृश्यम’ या बॉलिवूडटाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे, कारण या फ्रँचायझीमधील तिसरा भाग, ‘दृश्यम 3 ‘ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मात्र याच चित्रपटापासून प्रेरणा घेऊन, त्याच धर्तीवर पोलिसांना चकवा देऊन, त्यांची दिशाभूल करून , पुरावे नष्ट करण्याचा खळबळजनक कट बिहारमधील समस्तीपूर येथे उघडकीस आला आहे. सूरत येथे काम करणाऱ्या का कलियुगी मुलाने जमिनीच्या वादातून तब्बल 2 हजार किलोमीटरचा प्रवास करून गाव गाठलं आणि आपल्या शेतकरी वडिलांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याचा भयानक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने त्याचा मोबाइल सुरतमध्येच बंद ठेवला होता, जेणेकरून त्याचे लोकेशन गुजरातमध्येच आहे, असं दिसेल. मात्र, घटनेच्या काही वेळ आधी त्याने पत्नीला केलेल्या एका फोन कॉलमुळे त्याचा पितळ उघडं पडलं आणि संपूर्ण डाव उघडकीस आला.
समस्तीपुर जिल्ह्यातील हलई ठाणे क्षेत्रातील दरबा गावातील ही दुर्दैवी घटना आहे. 27 जुलै 2026 रोजी शेतकरी रघुवीर साहनी हे घराबाहेर झोपले होते. मात्र तेव्हाच अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी रघुवीर यांचा जागीच मृत्यू झाला. सुरूवातील अज्ञात हल्लेखोराच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. समस्तीपुर एसपींच्या निर्देशानुसार, एसडीपीओ पटोरी यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करण्यात आली.
‘डंप डेटा’ आणि पत्नीला केलेल्या कॉलमुळे केसला नवं वळण
सुरुवातीच्या तपासात पोलिसांच्या हाती ठोस धागा लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळाचा ‘डंप डेटा’ तपासण्यास सुरुवात केली. या तपासातून मृतकाचा मुलगा शिवशंकर सहनी याचा मोबाइल नंबर पोलिसांच्या हाती लागला. मात्र, कुटुंबीय आणि गावकऱ्यांच्या माहितीनुसार शिवशंकर सूरतमध्ये राहून काम करत होता.
मोबाइल बंद करण्याचा डाव
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी शिवशंकरने सूरतमध्येच आपला मोबाइल स्विच ऑफ केला. त्यामुळे पोलिसांच्या सर्व्हिलन्समध्ये त्याची शेवटची लोकेशन गुजरातमधीलच दिसत होती. आपण सूरतमध्येच असल्याचा भास निर्माण करून तपास यंत्रणेला चकवा देण्याचा त्याचा प्रयत्न होता.
एक कॉलने उलगडलं रहस्य
मात्र, मोबाइल बंद करण्यापूर्वी शिवशंकरने आपल्या पत्नीशी केलेला फोन कॉल त्याच्यासाठी अडचणीचा ठरला. या कॉलची टॉवर लोकेशन आणि इतर तांत्रिक पुरावे तपासल्यानंतर पोलिसांसमोर त्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
पटोरी स्टेशनवरून चालत पोहोचला गावी
पोलीसांच्या टीमने सूरतमध्ये पोहोचून आरोपी शिवशंकरला अटक केली, त्यानंतर त्याने चौकशीत संपूर्ण भयानक कट उघड केला. पाटोरी स्टेशनवरून ट्रेनमधून उतरल्यावर तो रात्रीच्या अंधारात अनेक किलोमीटर पायी चालत गावात पोचला, जेणेकरून वाटेत कोणीही त्याला ओळखू नये. घरी पोहोचल्यावर तो मागील दरवाजातून आत आला आणि तिथली कुऱ्हाड घेऊन वडिलांची हत्या केली. त्यानंतर ती कुऱ्हाड तेथेच टाकून तो तसाच पाटोरी स्टेशनपर्यंत परत गेला आणि ट्रेनने पटणातून परत सूरतकडे पळून गेला.
शिवशंकर याला गावातली काही जमीन विकत होती, पण वडिलांच्या त्याला सक्त विरोध होता. यामुळेच घरात खूप भांडणं, वाद सुरू होतो. अखेर मुलाने वडिलांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्याने ‘दृश्यम’ सारखी स्क्रिप्ट तयार केली आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर तो पकडला गेलाच.
