पहा कुठपर्यंत झाले बुलेट ट्रेनचं काम ? रेल्वेने दिले महत्वाचे अपडेट

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम गुजरात राज्यात वेगाने सुरु असून सुरत, आनंद, वापी, अहमदाबाद स्थानकाच्या कॉंक्रीटीकरणाचे काम विविध टप्प्यावर पोहचले आहे. रेल्वेने याबाबत व्हिडीओ जारी केला आहे.

पहा कुठपर्यंत झाले बुलेट ट्रेनचं काम ? रेल्वेने दिले महत्वाचे अपडेट
bullet train
Image Credit source: socialmedia
| Updated on: Oct 27, 2023 | 7:31 PM

मुंबई | 27 ऑक्टोबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. या प्रकल्पाच्या गुजरात राज्यातील सुरत, आनंद, वापी आणि अहमदाबाद या चार स्थानकांचे सुरु असलेले काम कोणत्या टप्प्यावर पोहचले आहे याची माहीती रेल्वे मंत्रालयाने जारी केली आहे. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या गुजरात राज्यातील 100 टक्के जमिनीचे संपादन पूर्ण झाल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले होते.

सुरत स्थानक

सुरत स्थानकाचे डीझाईन सुरत शहर डायमंड सिटी असल्याने त्यानूसार त्याचे इंटिरेअर तयार करण्यात आले आहे. हे स्थानक सुरत जिल्ह्याच्या अंतरोली गावाजवळ आहे. या स्थानकाचा बिल्टअप एरिया 58,352 चौरस मीटर आहे. स्थानकाची एकूण उंची 26.3 मीटर इतकी आहे. या स्थानकाचे 450 मीटर कॉनकोर्स आणि 450 मीटर रेल लेव्हल एरिया पूर्ण झाला आहे.

आनंद स्थानक

दूधाची सफेद क्रांतीवर आधारित या स्थानकाचे डीझाईन असणार आहे. नाडीयाड जिल्ह्याच्या उत्तरसंडा गावाजवळ हे स्थानक आहे. बिल्टअप एरिया 44,073 चौरस मीटर आहे. जमीनीपासून स्थानकाची उंची 25.6 मीटर आहे. 425 मीटर लांबीचा कॉनकोर्स आणि रेल्वे फलाट बांधून तयार झाला आहे.

वापी स्थानक

वेगाशी संबंधित वापी स्थानकाचे डिझाईन आहे. वापी-सिल्वासा रोडवरील डुंगरा गावात हे स्थानक आहे. 28,917 चौरस फूटाचे क्षेत्रफळावर हे स्थानक उभे आहे. उंची 22 मीटर आहे. 100 मीटर रेल लेव्हल स्लॅबचे काम झाले आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

अहमदाबाद स्थानक

अहमदाबादची सांस्कृतिक झलक या स्थानकात दिसणार असून पतंगांचा वापर केला जाणार आहे. 38,000 चौरस मीटर बिल्टअप एरियात हे स्थानक बांधले जात आहे. सध्याच्या पश्चिम रेल्वेच्या फलाट क्र.10,11 आणि 12 वर हे स्थानक बांधले जाणार आहे. जमीनीपासून या स्थानकाची उंची 33.73 मीटर इतकी आहे. 435 मीटरचा कॉनकोर्स लेव्हल स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे.

प्रवासासाठी 2 तास 7 मिनिटे

508 किमी लांबीच्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा 352 किमी मार्ग गुजरात तर 156 किमी मार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे. दर ताशी 320 किमी वेगाने हे अंतर 2 तास 7 मिनिटात पूर्ण होणार आहे. या दोन महानगरातील प्रवासासाठी बसने 9 तास तर ट्रेनने 6 तास सध्या लागतात. हा प्रकल्प स्वातंत्र्याच्या 75 व्या महोत्सवात सुरु होणार होता. त्यास पाच वर्षांचा उशीर झाला आहे.