
Sharad Pawar On Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचा ताणलेले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांवर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित केले आहे. त्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला असून प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही काही निर्णय घेतले आहेत. यावरच आता खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. पाकिस्तान अॅक्शन घेईल याची मला शंका होती, ती खरी ठरली असं भाष्य शरद पवारांनी केलंय.
“पहलगाम हल्ल्यानंतर भारताने एकूण पाच निर्णय घेतले. एका दृष्टीने पाकिस्तानला एक मेसेज देण्याचं काम भारताने केलं. आता पाकिस्ताननेही काही निर्णय घेतलेत. भारताचं विमान त्यांच्या देशात जाणार नाही हे त्यांनी ठरवलं आहे. आपल्या विमानांना पाकिस्तानमधून प्रवास करावा लागतो. आता ते बंद केलं तर आपल्याला दूरच्या मार्गाने जावं लागेल. त्यामुळे प्रवास आर्थिकदृष्ट्या अधिक महाग होईल. आपण निकाल घेतले त्याचा परिणाम पाकिस्तानवर होईल. पण पाकिस्तान गप्प बसेल असं नव्हे. तेही अॅक्शन घेतील. ही शंका मला होती, ती खरी ठरली,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
पहलगाममधील झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीरच्या पर्यटनावरही परिणाम होणार आहे. त्यावरही शरद पवार यांनी मत व्यक्त केलं. “पहलगाममध्ये हल्ला झाला, तेव्हा काश्मीरचे लोकं रस्त्यावर उभे राहिले. भारताच्या बाजूने उभे राहिले. ही जमेची बाजू आहे. जे लोक भारताच्या बाजूने उभे राहिले त्यांचा चरितार्थ हा कदाचित संकटात जाईल अशी स्थिती आहे. याचीच मला काळजी याची आहे. काश्मीरचं अर्थकारण संकटात येईल. लोक पर्यटनाला जाणार नाहीत. याचा परिणाम काश्मीरच्या लोकांवर होईल. लोक काश्मीरला जाणार नाहीत. त्याची झळ स्थानिकांना बसेल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच काश्मीरमधील पर्यटन वाढावे तसेच तेथील स्थानिकांचा चरितार्थ भागावा यासाठी केंद्राने अधिक लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी व्यक्त केली.