Shivsena Symbol Hearing : शिंदेसेनेच्या वकिलाने शेवटच्या दिवशी टाकला तुरुपचा एक्का, उद्धव ठाकरेंना 440 व्होल्टचा झटका?
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीत शिंदे सेनेचे वकील ध्रुव मेहता यांनी 'विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी व्हीप लागू नाही' असा निर्णायक युक्तिवाद केला. हा ठाकरेंसाठी 440 व्होल्टचा धक्का मानला जात आहे. मेहतांनी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवर भर दिला आणि भारत गोगावले यांना अध्यक्षांनीच व्हीप म्हणून मान्यता दिल्याचे सांगितले.

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील आज शिंदे सेनेची सुनावणी पूर्ण झाली. शिंदे सेनेचे वकील ध्रुव मेहता यांनी आज शेवटचा युक्तिवाद केला. मात्र, या शेवटच्या युक्तिवादाच्या दिवशी ध्रुव मेहता यांनी तुरुपचा एक्का टाकून ठाकरेंना 440 व्होल्टचा झटका दिला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी व्हीप लागतच नाही, असा युक्तिवाद ध्रुव मेहता यांनी केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदे सेनेचे वकील ध्रुव मेहता यांनी आज व्हिपच्या उल्लंघनाच्या मुद्द्यावर अधिक जोर दिला. एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या आमदारांनी व्हिपचं उल्लंघन केल्याचा आरोप केला जात आहे. दोन वेळा या आमदारांनी व्हीप पाळला नाही, असं सांगण्यात आलं आहे. ठाकरेंकडून सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला होता आणि आमदारांनी अध्यक्ष निवडणुकीत व्हिप पाळला नाही, असं सांगितलं होतं. मात्र, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी व्हिप लागू करता येत नाही, असा युक्तिवादच ध्रुव मेहता यांनी केला आहे. आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हिपचं उल्लंघन केल्याने त्यांना अपात्र करण्यात यावं, असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. या युक्तिवादातील हवाच ध्रुव मेहता यांनी काढून घेतली आहे.
अध्यक्षांनीच मान्यता दिली
उदय सामंत, भरत गोगावले, योगेश कदम यांनी व्हिप मिळाला नसल्याचे सांगितले होते. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचे नाव चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि संग्राम थोपटे (काँग्रेस) यांनी सुचवले होते. भरत गोगावले यांनी जारी केलेला व्हिप महत्त्वाचा होता. त्यांना (गोगावले यांना) अध्यक्षांनी व्हिप म्हणून मान्यता दिली होती. भारत गोगावले यांना 3 जुलै रोजी अध्यक्षांनी व्हिप म्हणून मान्यता दिली आहे. यावर आमचे वकील मनिंदर सिंग आणि नीरज किशन कौल यांनी सविस्तर युक्तिवाद केला आहे, असं ध्रुव मेहता म्हणाले.
प्रकरणच निरर्थक
मेहता यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार आणि शक्तीवरही युक्तिवाद केला. विधानसभा अध्यक्षांच्या पॉवरकडे दुर्लक्ष करता येणार नाही. विधानसभा अध्यक्ष ही स्वतंत्र लवाद आहे आणि त्यांना 10 व्या शेड्यूल नुसार संपूर्ण अधिकार आहे. हे प्रकरण निरर्थक झालं आहे. ते आता त्या कार्यकाळचे सदस्य नाहीत त्यामुळे पात्रतेचा मुद्दाच नाही. तरीही विधानसभा अध्यक्षांचे अधिकार बघा, जेव्हा टर्म संपली तेव्हा अध्यक्ष देखील काही करू शकत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. सुनील प्रभू हे कधीच व्हिप होऊ शकत नाहीत, असंही ते म्हणाले.