मोठी बातमी! आणखी एका मोठ्या पक्षात उभी फूट, प्रदेशाध्यक्षांसह आमदारांची बंडखोरी, वेगळ्या गटासाठी राज्यपालांना पत्र?

गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांमध्ये फूट पडत असल्याचं पहायला मिळत आहे. आधी ममता बॅनर्जी यांच्या पक्षात मोठी फूट पडली, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटले, आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! आणखी एका मोठ्या पक्षात उभी फूट, प्रदेशाध्यक्षांसह आमदारांची बंडखोरी, वेगळ्या गटासाठी राज्यपालांना पत्र?
Upendra Kushwaha
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 24, 2026 | 8:18 PM

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय पक्षात फूट पडल्याचं समोर आलं आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला. भाजपने तृणमूल काँग्रेसला पराभवाचा मोठा धक्का दिला. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच तृणमूलमध्ये मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं होतं. ममता बॅनर्जी यांच्या हातून पश्चिम बंगालची सत्ता जाताच तृणमूलच्या तब्बल 58 आमदारांनी पक्षातून उठाव केला. त्यांनी वेगळ्या गटाला मान्यता मिळावी म्हणून राज्यपालांना पत्र देखील पाठवलं होतं. दरम्यान आमदार फुटल्यानंतर तृणमूलच्या वीस खासदारांनी देखील बंडखोरी केली. त्यांनी देखील आपला वेगळा गट स्थापन केला. दुसरीकडे महाराष्ट्रात देखील शिवसेना शिंदे गटाने शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिल्याचं पहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या खासदारांच्या पक्षप्रवेशाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता देखील देण्यात आली. हा शिवसेना ठाकरे गटासाठी सर्वात मोठा झटका होता. दरम्यान या दोन पक्षात फूट पडल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक मोर्चामध्ये फूट पडली आहे. चार आमदारांपैकी तीन आमदारांनी बंडखोरी केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. हा उपेंद्र कुशवाह यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार या बंडखोर आमदारांनी वेगळ्या गटाला मान्यता देण्यासाठी राज्यपालांना पत्र देखील पाठवलं आहे. मधुबनी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधव आनंद, दिनारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आलोक कुमार सिंह आणि बाजपट्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामेश्वर महतो यांनी पक्षातून बंडखोरी केली आहे.

Loading...

समोर आलेल्या माहितीनुसार हे तीनही आमदार पक्षावर नाराज होते. पक्षात ज्या पद्धतीने निर्णय घेतले जात होते, त्यावरून त्यांनी अनेकदा आपली जाहीर नाराजी व्यक्त केली होती. उपेंद्र कुशवाह यांनी त्यांच्या मुलाला मंत्री केलं होतं, यावरून देखील पक्षात असंतोष धुमसत होता. अखेर आता या असंतोषाचा स्फोट झाल्याचं पहायला मिळत आहे. आमदारांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. विशेष म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बंडखोर आमदारांमध्ये पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचा देखील समावेश आहे. पक्षात आमचं मत कधीही जाणून घेण्यात आलं नाही, असा आरोप या बंडखोर आमदारांनी केला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us