घरात 100 किलो साखरेचा साठा केल्यास शिक्षा होणार? कायदा काय सांगतो? वाचा…
Sugar Storage Rules : साखरेचे दर वाढल्याने अनेकांच्या आता काही लोक मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करून घरात साठवणूक करत असल्याचे समोर आले आहे. साखर साठवण्याचे नियम काय आहेत ते जाणून घेऊयात.

साखरेच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे की, मोठ्या प्रमाणात साखर आधीच खरेदी करून घरात साठवून ठेवल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते का? एखाद्या व्यक्तीने 100 किलो साखर खरेदी करून ती वैयक्तिक वापरासाठी घरात ठेवली, तर त्याला साठेबाजी मानले जाईल का? याबाबतचे नियम काय आहे ते सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
घरात 100 किलो साखर ठेवणे बेकायदेशीर?
सामान्य घरगुती ग्राहकाने स्वतःच्या वापरासाठी 100 किलो साखर खरेदी करून घरात ठेवणे हे स्वतःहून कोणतेही गुन्हेगारी कृत्य नाही. घरगुती वापरासाठी साखर साठवून ठेवण्याची अशी कोणतीही सर्वसाधारण मर्यादा नाही, ज्यामुळे 100 किलो साखर घरात ठेवणे बेकायदेशीर ठरेल. कृत्रिम टंचाई आणि किमतींमध्ये फेरफार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेले साठा नियंत्रणाचे नियम प्रामुख्याने व्यावसायिक व्यापारी, डीलर आणि घाऊक ग्राहकांना लागू होतात. घरगुती गरजेसाठी साखर खरेदी करणाऱ्या सामान्य कुटुंबांना हे नियम त्याच पद्धतीने लागू होत नाहीत. त्यामुळे घरात एक क्विंटल साखर असल्याने आपोआप दंड, अटक किंवा अन्य शिक्षा होत नाही.
अत्यावश्यक वस्तूंशी संबंधित कायदा काय सांगतो?
अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 हा सरकारला अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा, वितरण आणि साठवणूक नियंत्रित करण्यासाठी कायदेशीर चौकट उपलब्ध करून देतो. साठेबाजी, काळाबाजार आणि कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी सरकार गरजेनुसार व्यावसायिक पुरवठा साखळीवर नियंत्रण आणू शकते. साखरेचे नियमनही या कायद्याअंतर्गत जारी करण्यात आलेल्या विविध आदेशांद्वारे केले जाते. मात्र, या नियंत्रणाचा अर्थ असा नाही की घरगुती ग्राहकांना त्यांच्या योग्य वैयक्तिक गरजेसाठी मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करण्यावर पूर्णपणे बंदी आहे.
साखर व्यापाऱ्यांसाठी काय नियम आहेत?
साखर व्यावसायिक कारणांसाठी खरेदी करून साठवली जात असेल, तर त्यासाठी वेगळे नियम लागू होतात. साठा नियंत्रणाच्या नियमांनुसार साखर डीलर आणि व्यापाऱ्यांना निश्चित साठा मर्यादेचे पालन करावे लागते. एका डीलरसाठी कमाल साठा 4,000 क्विंटलपर्यंत असू शकतो. तसेच निश्चित कालावधीत साठा विकण्यासंबंधीही काही नियम असतात. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साखर साठवून बाजारातील पुरवठ्यावर परिणाम करू नये आणि किमतींमध्ये फेरफार करू नये, हा या नियमांचा मुख्य उद्देश आहे.