सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र पॅटर्न, तृणमूल पक्ष-चिन्ह कोणाच्या पदरात पडणार? वकील कपिल सिब्बल यांना वेगळीच भीती
तृणमूल काँग्रेस पक्ष कुणाचा, हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. या प्रकरणाचा निकाल लवकर लागावा, यासाठी ममता बॅनर्जी यांनी कोर्टात धाव घेतली आहे.

प्रमोद जगताप, प्रतिनिधी : शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद आधीच सुप्रीम कोर्टात सुरू आहे. या प्रकरणावर मागील 4 वर्षांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेनेनंतर आता तृणमूल काँग्रेस पक्षाचा वाद देखील सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. तृणमूल काँग्रेसच्या फुटीनंतर दोन्ही गटाने पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. आगामी पोटनिवडणुकीमुळे तृणमूल काँग्रेसचे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. आता तृणमूल काँग्रेस पक्ष कोणाचा, हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचलाय. परंतु तृणमूल काँग्रेसचं प्रकरण शिवसेनेसारखं होऊ नये, अशी भीती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाचा आदेश हा अंतिम नसल्याची महत्त्वाची टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे. या दाव्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट तर्क लढवले जात आहे.
सुप्रीम कोर्टात तृणमूल काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली. ममता बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. कपिल सिब्बल हे ममता बॅनर्जी यांच्या बाजूने युक्तिवाद करत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा आदेश योग्य असो किंवा अयोग्य पण तो अंतरिम आदेश आहे. अंतिम नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे’ अशी महत्वाची टिप्पणी कोर्टाने केली. त्यानंतर ‘कोर्टाने निवडणूक आयोगाला ऑक्टोबरपर्यंत हे प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी ममता बॅनर्जी यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टाकडे केली. मात्र, ऑक्टोबर महिना अगदी जवळ आहे, असं म्हणत ऋतब्रता बॅनर्जी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी याला आक्षेप घेतला. ‘विलंबामुळे शिवसेना प्रकरणात काय भोगावं लागल हे आपण पाहिले आहे. आपल्याला हा वाद सोडवावाच लागेल’ अशी महत्वाची टिप्पणी न्यायमूर्ती बागची यांनी केली. ‘ शिवसेनेसारखं पुन्हा घडू नये अशी माझी इच्छा आहे’ असं सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं.
सरन्यायाधीशांनी निवडणूक आयोगाच्या वकिलांना निर्णय घेण्यासाठी त्यांना किती वेळ हवा आहे? अशी विचारणा वकील सिब्बल यांनी केली. दोन्ही पक्षांच्या हितासाठी आम्हाला लवकर वेळ कळवा, अशा सूचना न्यायमूर्ती बागची यांनी आयोगाच्या वकिलांना दिल्या. सोमवारी या प्रकरणी आता पुन्हा सुनावणी होईल. ‘दोन्ही पक्षांचे हित लक्षात घेऊन या प्रकरणातील याचिकेवर निर्णय देण्यासाठी किती वेळ लागेल’ असा प्रश्न कोर्टाने आयोगाच्या वकिलांना विचारला. त्यावेळी निवडणूक आयोगाच्या वकिलांना आयोगाकडून सूचना घेऊन उत्तर कळवण्याचे निर्देश दिले. केंद्रीय निवडणूक आयोगाने तृणमूल कॉंग्रेस पक्ष आणि चिन्ह तात्पुरतं गोठवलं असल्याने ममता बॅनर्जी यांनी त्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.